इतरांना भूकंप आणण्याची भाषा करणाऱ्या भाजपमध्येच हादरा — नाराज कार्यकर्त्यांची राष्ट्रवादीकडे धाव…
गडचिरोली : जिल्ह्यात इतर पक्षांत भूकंप घडविण्याची गर्जना करणाऱ्या भाजपमध्येच आता भूकंपांचे सत्र सुरू झाल्याचे स्पष्ट होत आहे. मागील 25 वर्षांपासून भारतीय जनता पक्षाची निष्ठा जपलेल्या गीता हिंगे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केल्याने भाजप कोलमडले आहे. यापूर्वीच भाजपचे जिल्हा महामंत्री रवी ओल्लालवार यांनी सुद्धा पक्षत्याग करून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यामुळे आता भाजपात अक्षरशः डबल भूकंप झाल्याची राजकीय चर्चा जिल्हाभर रंगली आहे.
भाजपमध्ये खरा कार्यकर्ता मागे पडून बाहेरून आणलेल्या धनाढ्य आणि संबंधवादी उमेदवारांना महत्त्व देण्याच्या धोरणाविरुद्ध नाराजी शिगेला पोहोचली होती. नगराध्यक्ष पदासाठी योग्य हक्क असूनही गीता हिंगे यांना डावलण्यात आले, तसेच स्थानिक नेतृत्वाच्या विवादास्पद निर्णयांमुळे असंतोष उसळत गेला.
एकीकडे भाजपचे वरिष्ठ नेते “इतर पक्षात फूट पाडू” म्हणून जाहीर मंचावर बोलत होते, परंतु वास्तवात मात्र भूकंप स्वतःच्या पक्षातच झाला, अशी टीका आता राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.
भाजपमधील कार्यकर्त्यांचे असंतोष, गटबाजी आणि दुर्लक्ष या कारणांमुळे अनेक नाराज कार्यकर्त्यांचे पाऊल राष्ट्रवादीकडे वळत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे वर्चस्व वाढत असून, या राजकीय उलथापालथीचा प्रभाव येणाऱ्या निवडणुकांवर मोठ्या प्रमाणात दिसून येईल, असा अंदाज राजकीय तज्ञ मांडत आहेत.




