Home राजकीय आरमोरी नगरपरिषद निवडणुकीत दिपक बेहरे यांना मोठा धक्का; न्यायालयात अपील फेटाळले —...

आरमोरी नगरपरिषद निवडणुकीत दिपक बेहरे यांना मोठा धक्का; न्यायालयात अपील फेटाळले — ‘अधिकृत उमेदवाराबाबत वेळेत कागदपत्रे न आल्याने अर्ज अवैध’

0
617

 

 

गडचिरोली, दि. २५ नोव्हेंबर:

आरमोरी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये शिवसेना (शिंदे गट) कडून उमेदवारी मिळविण्याच्या शर्यतीत निर्माण झालेल्या गोंधळावर आज न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. दिपक बळीराम बेहरे यांनी दाखल केलेले नामनिर्देशन रद्द करण्याविरोधातील अपील प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्री. विनायक रा. जोशी यांनी फेटाळून लावले असून, सचिन विनायक लांजेवार यांनाच पक्षाचे अधिकृत उमेदवार मान्य करण्यात आले आहे.

१७ नोव्हेंबरला प्रभाग क्रमांक १० मधून शिवसेना (शिंदे गट) तर्फे दिपक बेहरे आणि सचिन लांजेवार — दोघांनीही नामनिर्देशनपत्रासोबत ‘नमुना २-ब’ आणि ‘जोडपत्र २’ सादर केले. पक्षातर्फे चूक लक्षात आल्यावर बेहरे यांच्या उमेदवारीस मान्यता द्यावी म्हणून स्पष्टीकरणाचे पत्र देण्यात आले — मात्र ते १८ नोव्हेंबरला, म्हणजेच छाननीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सादर झाले.

 

निवडणूक अधिकाऱ्याचा निर्णय नियमांनुसार…

राज्य निवडणूक आयोगाच्या ५ मे २०२५ च्या सुचनांनुसार,एकाच पक्षाचे दोन उमेदवार असतील तर शेवटच्या दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत पक्षाने अधिकृत उमेदवाराचे नाव लेखी स्वरूपात कळवणे बंधनकारक आहे.

जर तसे झाले नाही तर सर्वप्रथम नामनिर्देशनपत्र दाखल करणारा उमेदवार अधिकृत मानला जातो.याच नियमाच्या आधारे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सचिन लांजेवार यांचा अर्ज वैध ठरवला आणि बेहरे यांचा अर्ज अवैध.

 

 

न्यायालयाने स्पष्ट केले की,नामनिर्देशनातील त्रुट्या निर्धारित वेळेच्या आतच दुरुस्त करणे अपेक्षित होते,पक्षाचे अधिकृत पत्र नियमानुसार वेळेत न आल्यास उमेदवारी नाकारण्यास पर्याय नसतो,हे फक्त ‘किरकोळ दोष’ नसून ‘मुलभूत त्रुटी’ आहे

अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज स्वीकारण्याची मागणीही ग्राह्य नाही, कारण त्यासाठी आवश्यक ते ५ सुचकांचे अनुमोदन बेहरे यांनी सादर केले नव्हते

या निर्णयानंतर प्रभाग–१० मध्ये आता शिवसेना (शिंदे गट) कडून सचिन विनायक लांजेवार यांच्या उमेदवारीस अधिकृतता मिळाली असून, आगामी निवडणुकीतील समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. स्थानिक राजकारणात या निकालावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here