गडचिरोली :
नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात प्रचंड असंतोष उसळलेला दिसत आहे. नागरिकांचा एकमुखी सवाल — “४०० कोटींचा निधी मिळूनही शहर बदललेच नाही… मग आता कोणता चमत्कार होणार?”
शहरात सर्वत्र—चहाच्या टपऱ्या, बाजारपेठा, चौक आणि गृहभेटींमध्ये—एकाच मुद्द्यावर तीव्र चर्चा सुरू आहे की गेल्या पाच वर्षात सत्ता, पैसा आणि सर्व यंत्रणा हातात असूनही नगरपालिकेने शहराच्या विकासाकडे पाहिलेच नाही.
महिला उमेदवारांमागे त्यांचे पतीच राजकारण चालवणार? — नागरिकांचा प्रश्न…
निवडणूक मैदानात उतरलेल्या काही महिला उमेदवारांविषयी शहरात नवी चर्चा रंगू लागली आहे.
अनेक नागरिक खुलेपणाने म्हणत आहेत की “महिला उमेदवारांना पुढे केले जात आहे, पण मागून त्यांच्या पतींचेच राजकारण, नियंत्रण आणि सत्ता सुरू होणार… तर मग खरी प्रतिनिधित्व कुणी करणार?”यामुळे सर्वसाधारण जनतेत संशय आणि नाराजीचे सूर अधिक तीव्र झालेले दिसत आहेत.
शेकडो कोटींच्या गटार लाईनमुळे संपूर्ण शहर खोदकामात बदलले; वाहतूक व्यवस्था ठप्प…
गडचिरोली शहरातील सर्वात मोठी नाराजीची ठिणगी म्हणजे गटार लाईन प्रकल्पाचे अव्यवस्थित नियोजन, शेकडो कोटींचा प्रकल्प,शहरातील ३०–३५% रस्ते महिने-महिने खोदलेले,धूळ, चिखल आणि दैनंदिन वाहतुकीचा थारा बोंबललेला
स्थानिक नागरिक म्हणतात की “काम सुरू करायचं, पण पूर्ण न करता महिनेभर खड्डेच खड्डे ठेवायचे… अशी प्रशासनाची पद्धत आम्ही किती दिवस सोसणार?” यामुळे शाळकरी मुले, व्यापारी, रुग्णवाहिका आणि दैनंदिन प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
अतिक्रमण हटवण्यात भेदभाव..?
फुटपाथवर रोजीरोटी कमावणाऱ्यांवर कारवाई — पण मोठ्या व्यावसायिकांना हात लावायलाही भीती!
शहरात आणखी एक गंभीर मुद्दा नागरिकांनी उचलून धरला आहे. त्यांच्या मते नुकत्याच झालेल्या अतिक्रमण कारवाईत स्पष्ट भेदभाव केलेला दिसला.
नागरिकांचे आरोप…फुटपाथवर रोजीरोटी कमावणाऱ्या लहान विक्रेत्यांना बेदरकारपणे हटवले,त्यांचा उदरनिर्वाह ठप्प झाला,पण मोठ्या व्यावसायिकांनी सर्विस रोडवर बांधलेल्या भलामोठ्या इमारती, रॅम्प, पार्किंग अतिक्रमणे मात्र सुरक्षित ठेवली
प्रशासनाचा दंडुका केवळ गरीबांवरच चालवला…
एकजण म्हणतो—
“फुटपाथवाल्यांना हटवायचे… पण मोठ्या दुकानांच्या अतिक्रमणाला हातही लावायचा नाही. हा कोणता न्याय..?
शहरातले प्रश्न नेमके तिथेच — उलट आता अधिक भीषण…
रस्त्यांची अवस्था, नाल्यांची सफाई, पाणीपुरवठा, वाहतूक नियंत्रण, शहर नियोजन… जे प्रश्न पाच वर्षांपूर्वी होते, तेच आज अधिक तीव्रतेने डोके वर काढत आहेत.
गेल्या पाच वर्षांत रस्ते कोलमडले,चौकातील सिग्नल दिवसातून तीन वेळा बिघडणे,वाहतूक व्यवस्थेचा खेळखंडोबा,अतिक्रमण वाढतच राहिले
शहरातील स्वच्छता यंत्रणा विस्कळीत….
निवडणूक जवळ, पण जनता सावध — “नवे चेहरे, नवे काम हवे”
निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारांकडून पुन्हा मोठमोठी आश्वासने, नवी स्वप्ने दाखवली जात आहेत. पण जनता ठामपणे म्हणते—
“प्रत्यक्ष काम शून्य असेल, तर आश्वासने देण्यात काय अर्थ? आम्हाला खरोखर काम करणारे नेतृत्व हवे.”
महिला उमेदवारांच्या मागे ‘अदृश्य पतींचा राजकारणी हस्तक्षेप’, गटार लाईनचे खोदकाम, रोजीरोटीवर कारवाई आणि मोठ्या व्यावसायिकांना दिलेले पाठीशी—हे सर्व मुद्दे निवडणुकीत तापदायक ठरणार हे स्पष्ट झाले आहे.




