गडचिरोली।
शिवसेना जिल्हाप्रमुख व जिल्हा नियोजन समिती सदस्य राकेश बेलसरे यांनी केलेल्या निवेदनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे वित्त, नियोजन, सहकार व कायदा मंत्री एडवोकेट आशीष जयस्वाल यांनी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शिक्षा अभियानांतर्गत मंजूर शाळा बांधकाम, शाळा दुरुस्ती व शौचालय बांधकाम या कामांची मान्यता तात्पुरती स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत.
बेलसरे यांनी आपल्या पत्रात नमूद केले होते की जिल्ह्यात मंजूर झालेली अनेक शाळा व शौचालय कामे अपूर्ण आहेत तसेच अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी सर्व कामांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.
मंत्री जयस्वाल यांनी आदेशात स्पष्ट केले की चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणतीही नवी मान्यता देण्यात येणार नाही आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. जिल्हा परिषद गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना याबाबत आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.