गडचिरोली : सुभाषग्राम येथे मोठ्या उत्साहात सुरू झालेल्या राज्यस्तरीय नेताजी फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन गडचिरोली जिल्ह्याचे सह-पालकमंत्री ऍड.आशिष जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आमदार डॉ. मिलिंद नरोटे उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार डॉ.अशोक नेते हजर होते. यावेळी शिवसेनेचे राकेश बेलसरे, रवी ओलालवार यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे आमदार डॉ. नरोटे यांनी खेळाडूंना दिलेला पाच लाख रुपयांचा निधी. या अनुदानामुळे खेळाडू व क्रीडाप्रेमींमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला असून आयोजक मंडळाने याबद्दल आमदारांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
खेळाचे महत्त्व अधोरेखित करत आयोजकांनी सांगितले की, खेळ तरुणांना व्यसनापासून दूर ठेवतो, शरीराला ऊर्जा देतो आणि समाजात एकता निर्माण करतो. फुटबॉलसारख्या खेळामुळे ग्रामीण भागातील क्रीडा प्रतिभेला राज्य व राष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याची संधी मिळते.
मात्र, या पार्श्वभूमीवर उपस्थितांमध्ये एक खोचक चर्चा रंगली. “फुटबॉलप्रमाणेच प्रत्येक खेळाला अनुदानाची गरज आहे. आमदार साहेबांनी सर्व खेळांसाठी असाच निधी द्यावा,” अशी मागणी इतर खेळाडू प्रेमींनी सुद्धा व्यक्त केली व लक्षात ठेवले यांनी व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्याला मैदानावरील क्रीडा-प्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
एकंदरित, सह-पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या या उद्घाटन सोहळ्यात आमदार डॉ. नरोटे यांचा पाच लाखांचा निधी चर्चेचा केंद्रबिंदू ठरला, आणि पुढील काळात इतर खेळांसाठीही सर्व बाजूने चांगल्या प्रकारचा असाच पाठिंबा निधी सहित मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त झाली.