गडचिरोली, ता. २: तीन हिस्सेदारांच्या नावाने जमिनीचा फेरफार करुन त्यांची नावे सातबारावर नोंद करण्यासाठी संबंधित इसमाकडून ६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज अहेरी तालुक्यातील महागाव साजाचा पटवारी व्यंकटेश सांबय्या जल्लेवार (४०) व खमनचेरु येथील मंडळ अधिकारी भूषण रामभाऊ जवंजाळकर (३८) यांना अटक केली.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराला तीन व्यक्तींच्या नावाने असलेल्या जमिनीचा फेरफार करुन त्यांची नावे सातबारावर नोंद करावयाची होती. त्यासाठी पटवारी व्यंकटेश जल्लेवार याने स्वतःसाठी आणि मंडळ अधिकारी भूषण जवंजाळकर याच्यासाठी प्रत्येकी ४ हजार ५०० रुपये याप्रमाणे एकूण ९ हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती ते दोघांसाठी प्रत्येकी ३ हजार याप्रमाणे एकूण ६ हजार रुपये स्वीकारण्यास तयार झाले. परंतु लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर या विभागाचे पोलिस उपअधीक्षक चंद्रशेखर ढोले यांच्या नेतृत्वात कर्मचाऱ्यांनी पडताळणी करुन सापळा रचला असता आज दोघांना ६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पंचांसमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले. जल्लेवार व जवंजाळकर यांच्यावर अहेरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या निवासस्थानाचीही झडती घेण्यात आली.
एसीबीचे पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर, अपर पोलिस अधीक्षक सचिन कदम, संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक चंद्रशेखर ढोले, पोलिस निरीक्षक शिवाजी राठोड, सहायक फौजदार सुनील पेद्दीवार, हवालदार शंकर डांगे, हवालदार किशोर जौंजारकर, प्रवीण जुमनाके यांनी ही कारवाई केली.