Gadchiroli district highlights..27/1/2023
गडचिरोली : शहरातील मुख्य वनसंरक्षकांच्या कार्यालयामागे असलेल्या जिल्हा स्टेडियम लगत असलेल्या जागेवर गोकुळनगर येथील एका भू माफीयाने चुन्याने जागा आखून त्याचे प्लाॅट पाडले. आणि ते शहरातील काही लोकांना विकल्याचा प्रकार काल घडल्याची माहिती उजेडात आली आहे.
मुख्य वनसंरक्षकांच्या कार्यालयामागे असलेल्या जिल्हा स्टेडियम ला लागून वन विभागाची जमीन आहे. त्यालाच लागून असलेल्या संघर्ष नगरातील जुन्या अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण हटविण्यास उच्च न्यायालयाने यापूर्वी स्थगिती दिल्याची संधी साधून हे प्लाॅट पाडून कालच दिवसभरात कच्च्या झोपड्या बांधण्याचे काम केले गेले आहे.
गोकुळनगर परिसरातील वन जमिनीवर ले आऊट टाकून प्लाॅट विक्रीचा झालेला गोरखधंदा चर्चेत असतांनाच आता खुद्द मुख्य वनसंरक्षकांच्या कार्यालयामागे एकाच दिवसात झालेल्या अतिक्रमणाला नेमका कोणाचा आशिर्वाद आहे. असा प्रश्न विचारला जात असून, जिल्हा ठिकाणावर ही परिस्थिती आहे तर जिल्ह्यातील इतर भागातील वन जमीनीचे रक्षण वन विभाग खरेच करु शकेल काय? ही शंकाही यानिमित्ताने निर्माण झाली आहे.