Home ब्रेकिंग न्यूज गडचिरोलीत नगरपालिकेचा ‘पाणी विक्री घोटाळा’ उघड; महाराजा मार्केटमध्ये करचोरीचाही संशय, चौकशीची मागणी...

गडचिरोलीत नगरपालिकेचा ‘पाणी विक्री घोटाळा’ उघड; महाराजा मार्केटमध्ये करचोरीचाही संशय, चौकशीची मागणी तीव्र…

0
623

 

गडचिरोली | प्रतिनिधी

गडचिरोली शहरातील नगरपालिकेच्या कारभारावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरातील एका धनदांडग्या व्यक्तीच्या मालकीच्या जागेवर, स्वतःच्या विहिरीत मुबलक पाणी उपलब्ध असतानाही नगरपालिकेकडून छुप्या पद्धतीने टँकरद्वारे पाण्याची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार आज उघडकीस आला. ही घटना आज सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास चंद्रपूर रोडवरील फुटक्या देवळासमोरील परिसरात घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, सर्वे क्रमांक १६८१, महाराजा मार्केट परिसरात सुमारे ५००० चौरस फुटांवर भव्य दोन मजली शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्यात आले आहे. या ठिकाणी एचडीएफसी बँकेसह अनेक व्यावसायिक दुकाने कार्यरत आहेत. याशिवाय सुमारे २० ते २२ हजार चौरस फूट मोकळी जागा उपलब्ध असून, त्या परिसरात इंग्रजकालीन मोठी विहीर आजही अस्तित्वात आहे. असे असतानाही या विहिरीतील पाण्याचा वापर न करता नगरपालिकेच्या टँकरद्वारे पाण्याची विक्री होत असल्याचे उघड झाले.

आज सकाळी या ठिकाणी नगरपालिकेचा टँकर लावून पाण्याची विक्री सुरू असताना काही जागरूक नागरिकांनी हा प्रकार रंगेहात पकडला. अधिकाऱ्यांना जाब विचारल्यानंतर टँकर तात्काळ मागे बोलावण्यात आला. त्यानंतर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न म्हणून संबंधित बिल्डिंग मालकाकडून केवळ ७०० रुपयांची पावती काढण्यात आल्याचेही समोर आले आहे.

दरम्यान, या प्रकरणाला आणखी एक गंभीर वळण मिळाले असून, याच महाराजा मार्केट (सर्वे क्रमांक १६८१) मध्ये मागील २० वर्षांपासून करचोरी होत असल्याची तक्रार यापूर्वीही करण्यात आली होती. मात्र, त्या वेळीही नगरपालिकेकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचे समोर येत आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, या आस्थापनेची सखोल चौकशी केल्यास मागील २० ते २५ वर्षांपासूनच्या करचोरीचा आकडा कोटींच्या घरात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. शॉपिंग कॉम्प्लेक्समधील व्यावसायिक उत्पन्न, भाडेकरूंकडून मिळणारा किराया, तसेच इतर आर्थिक व्यवहारांचा तपशीलवार हिशोब तपासून संबंधितांवर योग्य करआकारणी करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

गडचिरोली शहरात अनेक भागांत पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असताना सामान्य नागरिकांना वेळेवर पाणीपुरवठा मिळत नाही. अशा परिस्थितीत, ज्या ठिकाणी पाण्याची मुबलक सुविधा उपलब्ध आहे, त्या ठिकाणी नगरपालिकेकडून खाजगी स्वरूपात पाणी विक्री होणे अत्यंत संतापजनक असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

या संपूर्ण प्रकरणाची माहिती प्रभारी मुख्य अधिकारी अर्चना मेंढे तसेच पाणीपुरवठा सभापती लीलाधर भरडकर यांना देण्यात आली असून, त्यांनी तात्काळ चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

दरम्यान, गडचिरोली नगरपालिकेत अशा प्रकारचे गैरव्यवहार इतर विभागांमध्येही सुरू आहेत का, याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच महाराजा मार्केटमधील करचोरी प्रकरणाचीही उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here