Home भ्रष्टाचार स्वर्गरथ दुरुस्तीत 9.63 लाखांचा खर्च; गडचिरोली नगर परिषदेत गैरव्यवहाराच्या चर्चांना उधाण…

स्वर्गरथ दुरुस्तीत 9.63 लाखांचा खर्च; गडचिरोली नगर परिषदेत गैरव्यवहाराच्या चर्चांना उधाण…

0
990

 

गडचिरोली | प्रतिनिधी

गडचिरोली नगर परिषदेतील गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या प्रशासकीय कारभारावर आता गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्यामुळे या कालावधीत ‘अधिकारी राज’ सुरू होते. याच काळात विविध विकासकामांमध्ये अनियमितता झाल्याच्या चर्चांना उधाण आले असून, स्वर्गरथाच्या दुरुस्तीसाठी करण्यात आलेल्या तब्बल ₹9.63 लाख खर्चामुळे हे प्रकरण चांगलेच गाजू लागले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नगर परिषदेच्या स्वर्गरथाच्या दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करण्यात आला. मात्र, केवळ दुरुस्तीवर एवढी मोठी रक्कम खर्च केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. “वाहनाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी एवढा प्रचंड खर्च म्हणजे ‘मलिदा’ लाटण्याचा प्रकार नाही का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

शहरात सुरू असलेल्या चर्चेनुसार, जवळपास ₹9 लाख 63 हजार इतका खर्च दुरुस्तीवर करण्यापेक्षा थोडा अधिक निधी खर्च करून नवीन स्वर्गरथ खरेदी करणे अधिक किफायतशीर ठरले असते, असा मुद्दा पुढे येत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या निर्णयक्षमतेवर तसेच आर्थिक नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता स्वर्गरथाची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. नगर परिषद प्रशासनाकडून ही सेवा उपलब्ध करून दिली जात असली तरी, वाहनाच्या एकूण किंमतीच्या 50 ते 75 टक्के रक्कम जर केवळ दुरुस्तीवर खर्च होत असेल, तर त्या निर्णयाची योग्यताच संशयास्पद ठरत आहे.

दरम्यान, एवढ्या मोठ्या खर्चासाठी आवश्यक असलेली निविदा प्रक्रिया (टेंडर) राबविण्यात आली होती का, याबाबतही संशय व्यक्त केला जात आहे. काँग्रेसच्या एका नगरसेवकांनी या संपूर्ण खर्चाची सविस्तर माहिती मागविली असून, कोणत्या बाबींवर किती रक्कम खर्च झाली याची आकडेवारी लवकरच समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासकीय कार्यकाळात आणखी किती कामांमध्ये अनियमितता झाली आहे, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.

“खर्च संशयास्पद; सखोल चौकशी व्हावी” — श्रीकांत देशमुख

नगरसेवक श्रीकांत शरदराव देशमुख यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया देताना म्हटले की, “शहरासाठी स्वर्गरथाची आवश्यकता नक्कीच आहे; मात्र दुरुस्तीवर झालेला खर्च अवास्तव आहे. या खर्चात थोडी भर घातली असती, तर नवीन वाहन खरेदी करता आले असते. त्यामुळे हा खर्च संशयास्पद असून, त्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here