चामोर्शी (गडचिरोली) :
चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरात शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्याच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला आता राजकीय पाठिंबा मिळू लागला आहे. शेतकरी बचाव जनआंदोलन समितीच्या वतीने सुरू असलेल्या धरणे व मुंडण आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीने जाहीर पाठिंबा देत शेतकऱ्यांच्या लढ्याला सक्रिय सहकार्य करण्याची घोषणा केली आहे.
भेंडाळा परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्याच्या प्रस्तावामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांची संमती न घेता जमिनी अधिग्रहित करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. शेती हीच या परिसरातील शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन असल्याने जमिनी गेल्यास त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होणार असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकरी बचाव जनआंदोलन समितीच्या माध्यमातून भेंडाळा परिसरात धरणे व मुंडण आंदोलन सुरू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीने जाहीर पाठिंबा दर्शवला असून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा देण्याची भूमिका स्पष्ट केली आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय त्यांच्या सुपीक जमिनी अधिग्रहित करणे अन्यायकारक आहे. शासनाने तात्काळ हा निर्णय मागे घेऊन शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करावा. अन्यथा शेतकऱ्यांच्या लढ्याला व्यापक स्वरूप देण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे पूर्व विदर्भ संयोजक प्रा. हितेश मडावी, जिल्हाध्यक्ष प्रा. प्रशांत देव्हारे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य देवानंद दुर्गे, सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र जुवारे, भेंडाळा येथील सरपंच कुंदा जुवारे, शेतकरी बचाव जनआंदोलन समितीचे अध्यक्ष मनोज पोरटे तसेच परिसरातील अनेक शेतकरी व प्रतिनिधी उपस्थित होते.
आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले की, शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहणाचा निर्णय रद्द होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असून शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय होऊ दिला जाणार नाही.




