गडचिरोली, दि. ७ मार्च :
गडचिरोली येथील महिला व बाल रुग्णालयात स्वच्छतागृहांना कुलूप लावण्यात आल्यामुळे रुग्ण व त्यांच्या पालकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे, शौचालयासमोर एका मुलाला शौच करावी लागल्यानंतरही जवळपास १५ तासांपर्यंत ती घाण तशीच पडून असल्याचे दिसून आल्याने रुग्णालयातील स्वच्छता व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका लहान मुलाला अचानक तीव्र पोटदुखी सुरू झाल्याने त्याला तातडीने महिला व बाल रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. ओपीडीची चिठ्ठी काढत असतानाच त्या मुलाला पोटदुखीमुळे तातडीने शौचालयाची गरज भासली. मात्र रुग्णालय परिसरातील तिन्ही स्वच्छतागृहांना कुलूप लावलेले असल्याचे आढळून आले. त्यामुळे मुलाला शौचालयाच्या शोधात इकडून तिकडे फिरावे लागले.
परिस्थिती अत्यंत बिकट झाल्याने आणि शौचालय बंद असल्यामुळे अखेर त्या मुलाला शौचालयासमोरच शौच करावी लागली. यामुळे मुलासह त्याच्या पालकांनाही अत्यंत लाजिरवाणी व त्रासदायक परिस्थितीला सामोरे जावे लागले.
या घटनेनंतर रुग्णालयातील स्वच्छता व्यवस्थेबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या संदर्भात रुग्णालयातील डॉ. प्रशांत पेंदाम यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधण्यात आला असता त्यांनी डॉ. ठवरे हे ड्युटीवर असल्याची माहिती दिली. त्यानंतर ओपीडी वॉर्ड क्रमांक ७ येथे भेट दिली असता डॉ. ठवरे जवळपास दीड तासापर्यंत तेथे दिसून आले नसल्याचे समोर आले.
दरम्यान, रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांनी सांगितले की कर्मचारी संख्या अपुरी असल्यामुळे रुग्णांना आवश्यक सोयी-सुविधा पुरविताना स्टाफला मोठी धावपळ करावी लागत आहे. त्यामुळे काही वेळा अशा समस्या निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय, वॉर्ड क्रमांक ७ मध्ये उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लहान मुलांना प्रचंड उष्णतेचा त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रारही पालकांनी व्यक्त केली आहे. सध्या बसवलेले सिलिंग पंखे उष्ण हवा फेकत असल्यामुळे रुग्णांना आराम मिळत नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे वॉर्डमध्ये थंड हवा मिळण्यासाठी योग्य कुलिंग व्यवस्था किंवा अन्य यंत्रणा बसविण्याची मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.
महिला व बाल रुग्णालयात दररोज मोठ्या प्रमाणावर लहान मुले आणि गर्भवती महिलांचे उपचारासाठी आगमन होत असते. अशा परिस्थितीत स्वच्छतागृह सदैव खुले ठेवणे, स्वच्छता व्यवस्था काटेकोर राखणे तसेच रुग्णांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही रुग्णालय प्रशासनाची जबाबदारी असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान, या घटनेबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की सदर प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर डॉक्टर माधुरी कीलनाके यांना तात्काळ घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच अशा प्रकारचा निष्काळजीपणा वारंवार होत असल्याने संबंधितांना कारणे दाखवा नोटीसही देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शौचालयांना कुलूप लावून रुग्णांना गैरसोय निर्माण करणारे कर्मचारी नेमके कोण आहेत, याचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी रुग्णांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. तसेच रुग्णालयातील स्वच्छतेची जबाबदारी सांभाळणाऱ्या कंत्राटी कंपनीकडून सफाई कर्मचाऱ्यांची योग्य नियुक्ती झाली आहे का आणि ते आपले कर्तव्य योग्यरीत्या पार पाडत आहेत का, याची सखोल चौकशी करण्याची मागणीही नागरिकांकडून जोर धरत आहे.




