Home ब्रेकिंग न्यूज चामोर्शीतील विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याच्या अफवांना पूर्णविराम; दिलेल्या औषधांमुळे कोणताही दुष्परिणाम नाही –...

चामोर्शीतील विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याच्या अफवांना पूर्णविराम; दिलेल्या औषधांमुळे कोणताही दुष्परिणाम नाही – आरोग्य विभाग.

0
204

 

गडचिरोली, दि. ५ :

गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील मुरखळा माल आणि लखमापूर बोरी येथील शाळांमधील काही विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याच्या बातम्यांमुळे परिसरात विविध अफवा पसरू लागल्या होत्या. ‘आयडीए (IDA)’ अभियानांतर्गत देण्यात आलेल्या गोळ्यांमुळे विद्यार्थ्यांना त्रास झाल्याची चर्चा होती. मात्र, या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर आरोग्य विभागाने औषधांमुळे कोणताही दुष्परिणाम झालेला नसल्याचे स्पष्ट केले असून सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगितले आहे.

या संदर्भात तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या वतीने सविस्तर तपासणी करण्यात आली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी सांगितले की, प्राथमिक चौकशीत विद्यार्थ्यांमध्ये दिसून आलेली लक्षणे ही औषधांच्या दुष्परिणामामुळे नसून हवामानातील बदलामुळे होणाऱ्या व्हायरल संसर्गाशी संबंधित असण्याची शक्यता आहे.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, मुरखळा माल येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत १८० पैकी १७८ विद्यार्थ्यांना आणि ७ शिक्षकांना, तर लखमापूर बोरी येथील लोकमान्य टिळक उच्च माध्यमिक विद्यालयात ३७ विद्यार्थ्यांना IDA अभियानांतर्गत औषधे देण्यात आली होती.

औषध वितरणानंतर २४ तासांच्या कालावधीत कोणत्याही विद्यार्थ्यामध्ये गंभीर दुष्परिणाम किंवा गुंतागुंत आढळून आलेली नाही, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम दुमपट्टीवर यांनी दिली.

हवामान बदलामुळे व्हायरल लक्षणे…

आरोग्य विभागाच्या तपासणीत काही विद्यार्थ्यांमध्ये ताप, सर्दी, उलट्या यांसारख्या तक्रारी आढळून आल्या. मात्र ही लक्षणे औषधांमुळे नसून हवामानातील बदलामुळे होणाऱ्या व्हायरल संसर्गामुळे असू शकतात, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

१० विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली; सर्वजण सुरक्षित…

मिळालेल्या माहितीनुसार, ज्या १० विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली, त्यापैकी दोन विद्यार्थ्यांनी औषध घेतलेच नव्हते, तर उर्वरित विद्यार्थ्यांनी १८ ते २६ फेब्रुवारीदरम्यान औषध घेतले होते. त्यांना २ मार्चपासून काही लक्षणे दिसू लागली.

सध्या या सर्व विद्यार्थ्यांवर ग्रामीण रुग्णालय चामोर्शी आणि सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.

पाण्याचे नमुने सुद्धा तपासणीसाठी पाठवले…

घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित गावांमधून २६ पाण्याचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी गडचिरोली प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

औषधांचा साठा पूर्णपणे प्रमाणित

प्रशासनाने स्पष्ट केले आहे की या अभियानासाठी वापरण्यात आलेल्या Ivermectin, D.E.C. आणि Albendazole या गोळ्या जिल्हा हिवताप कार्यालय गडचिरोली येथून प्राप्त झालेल्या असून त्या पूर्णपणे प्रमाणित आणि सुरक्षित आहेत.

अफवांवर विश्वास ठेवू नये – आरोग्य विभागाचे आवाहन

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र पेदद्ला यांनी पालकांना आवाहन केले की, कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. आरोग्य विभाग संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून सर्व विद्यार्थी सुरक्षित आहेत.

तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनीही नागरिकांना आवाहन करत सांगितले की, विद्यार्थ्यांमध्ये दिसलेली लक्षणे औषधांच्या दुष्परिणामांमुळे नसून इतर कारणांमुळे असू शकतात. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता आरोग्य विभागाच्या विविध आरोग्य मोहिमांना सहकार्य करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here