Home ब्रेकिंग न्यूज गडचिरोली जिल्ह्यात तब्बल अडीच वर्षांनी खुनाचा उलगडा; जमिनीच्या वादातून काकाने केली सख्ख्या...

गडचिरोली जिल्ह्यात तब्बल अडीच वर्षांनी खुनाचा उलगडा; जमिनीच्या वादातून काकाने केली सख्ख्या पुतण्याची हत्या…

0
382

कोरची (जि. गडचिरोली) – रक्ताच्या नात्यांवर संपत्तीच्या लालसेची सावली पडली की त्याचे परिणाम किती भीषण होऊ शकतात, याचे धक्कादायक उदाहरण कोरची तालुका येथे समोर आले आहे. जमिनीच्या वादातून आपल्या सख्ख्या पुतण्याची कुऱ्हाडीने हत्या करून मृतदेह जंगलात गाडणाऱ्या काकाचा आणि त्याच्या साथीदाराचा पोलिसांनी तब्बल अडीच वर्षांनी छडा लावला आहे. ‘डीएनए’ अहवालामुळे या थरारक हत्याकांडाचा गुंता सुटला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

बेपत्ता तरुणाचा सांगाडा जंगलात सापडला…

आंबेखारी येथील २३ वर्षीय महेश शामसाय कळ्यामी हा जुलै २०२४ पासून बेपत्ता होता. कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला, मात्र तो सापडत नव्हता. दरम्यान, नोव्हेंबर २०२४ मध्ये महेशची आई दुमलाबाई सरपण गोळा करण्यासाठी जंगलात गेली असता तिला संशयास्पदरीत्या पुरलेला मानवी सांगाडा आढळून आला. हा सांगाडा आपल्या बेपत्ता मुलाचाच असावा, असा संशय त्यांनी व्यक्त केला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तहसीलदारांच्या उपस्थितीत जागेचा पंचनामा करून अवशेष बाहेर काढले. मात्र, मृतदेहाची ओळख पटवणे कठीण असल्याने नमुने डीएनए तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले.

२८ फेब्रुवारी २०२६ रोजी प्राप्त झालेल्या डीएनए अहवालातून जंगलात सापडलेला सांगाडा महेशचाच असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला वेग देण्यात आला.
तपासात समोर आले की, महेशचा त्याचे वडील शामसाय आणि मोठे काका रामदास यांच्याशी जमिनीच्या हिस्स्यावरून सतत वाद होत होता. जुलै २०२४ मध्ये झालेल्या तीव्र वादानंतर रामदास आणि त्याचा साथीदार दसरू कल्लो यांनी महेशचा पाठलाग केला. त्याला जंगलात नेऊन कुऱ्हाडीने निघृण हत्या करण्यात आली. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह गाडण्यात आला. घटनेनंतर रक्ताने माखलेली कुऱ्हाड धुऊन आरोपींनी संशय टाळण्याचा प्रयत्न केला.

डीएनए अहवालानंतर पोलिसांनी संशयितांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून संपत्तीच्या वादातून रक्ताच्या नात्यालाही काळी छाया कशी पडते, याची हृदयद्रावक जाणीव पुन्हा एकदा समोर आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here