Home सामाजिक सोनापूर कॉम्प्लेक्स परिसरातील नाल्याच्या गंभीर प्रश्नावर नगर परिषदेची हालचाल; सभापतींच्या पुढाकाराने पाहणी,...

सोनापूर कॉम्प्लेक्स परिसरातील नाल्याच्या गंभीर प्रश्नावर नगर परिषदेची हालचाल; सभापतींच्या पुढाकाराने पाहणी, पावसाळ्यापूर्वी कामे करण्याचे निर्देश…

0
115

 

गडचिरोली : शहरातील प्रभाग क्रमांक ११ अंतर्गत सोनापूर कॉम्प्लेक्स परिसरातील पंचवटीनगर, गणेशनगर, बजरंगनगर आणि रेव्हेन्यू कॉलनी या भागातून जाणाऱ्या मोठ्या नाल्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून तो आता गंभीर स्वरूप धारण करत आहे. विशेषतः पावसाळ्यात या नाल्यामुळे परिसरात पाणी साचणे, अस्वच्छता निर्माण होणे आणि नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होणे अशा विविध समस्यांना स्थानिकांना सामोरे जावे लागत आहे.

या पार्श्वभूमीवर नगर परिषद प्रशासनाने या समस्येची दखल घेत प्रत्यक्ष पाहणी केली. नगर परिषदेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांनी संबंधित भागाला भेट देत नाल्याची स्थिती, त्यातील अडथळे आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींचा आढावा घेतला.

यावेळी नगर परिषदेचे पाणीपुरवठा सभापती लीलाधर भरडकर यांनीही पंचवटीनगर, बजरंगनगर, गणेशनगर आणि रेव्हेन्यू कॉलनी परिसरात जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधला. त्यांनी स्थानिकांच्या समस्या, तक्रारी आणि मागण्या जाणून घेतल्या. नागरिकांनी नाल्याची नियमित साफसफाई होत नसल्याने साचलेली घाण, अस्वच्छता, डासांचे प्रमाण वाढणे, अपुरे विद्युत पथदिवे तसेच पाण्याची समस्या याबाबत आपली नाराजी व्यक्त केली.

सभापती भरडकर यांनी या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेत मुख्याधिकारी यांना आवश्यक ती तातडीची कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. तसेच पावसाळा सुरू होण्यापूर्वी मोठ्या नाल्याची संपूर्ण साफसफाई, गाळ काढणे आणि खोलीकरण करण्याचे आदेश संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.

यावेळी सभापती भरडकर यांनी नागरिकांना आश्वासन देताना सांगितले की, या परिसरातील नाल्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी नगर परिषद कटिबद्ध असून विकासकामांना प्राधान्य दिले जाईल. नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या मूलभूत सुविधांसाठी त्रास सहन करावा लागू नये, यासाठी प्रशासन सकारात्मक पावले उचलणार आहे.

या पाहणीवेळी सामाजिक कार्यकर्ते रोशन कवाडकर, हिमांशू खरवडे, बादल कंकलवार, काव्य वालदे, अमोल जेट्टीवार, मंथन बुलबुले यांच्यासह परिसरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगर परिषद प्रशासनाने घेतलेल्या या पुढाकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून लवकरच नाल्याचा प्रश्न मार्गी लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here