गडचिरोली : शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने लायड्स मेटल कंपनीकडून सीएसआर निधीतून नगरपालिकेला देण्यात आलेली ऑटोमॅटिक रोड स्वीपिंग मशीन उद्घाटनानंतर अवघ्या २४ तासांतच तांत्रिक बिघाडामुळे वादाच्या केंद्रस्थानी आली आहे. रस्त्यावरील धूळ उचलण्याऐवजी ही मशीन धूळ हवेत उडवत असल्याचे प्रत्यक्ष पाहायला मिळाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, यामुळे भारतीय जनता पार्टी च्या मोठ्या नेत्याचा ‘राजहट्ट’ निष्फळ ठरल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे.
लायड्स मेटल कंपनीने शहरातील स्वच्छतेसाठी अत्याधुनिक ऑटोमॅटिक स्वीपिंग मशीन नगरपालिकेला उपलब्ध करून दिली होती. मात्र या मशीनचे उद्घाटन नगरपालिकेच्या परिसरात न करता स्थानिक आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या भाजप कार्यालयात करण्यात आले. या निर्णयामुळे सुरुवातीपासूनच राजकीय वर्तुळात आणि नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली होती. नगरपालिकेच्या मालकीच्या मशीनचे उद्घाटन राजकीय कार्यालयात का करण्यात आले, असा सवाल अनेकांनी उपस्थित केला होता.
दरम्यान, उद्घाटनानंतर जेव्हा मशीन प्रत्यक्षात रस्त्यांवर स्वच्छतेसाठी वापरण्यात आली, तेव्हा मशीन धूळ आपल्या टाकीत साठवण्याऐवजी तीच धूळ मोठ्या प्रमाणात हवेत उडवत असल्याचे दिसून आले. त्यामुळे स्वच्छतेचा उद्देश साध्य होण्याऐवजी नागरिकांना धुळीचा अधिक त्रास सहन करावा लागला. या प्रकारामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून मशीनच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
या घटनेनंतर शहरात विविध तर्कवितर्क लावले जात असून, उद्घाटनासाठी घाई करण्यात आल्यामुळेच मशीनची योग्य तांत्रिक तपासणी झाली नाही का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. काही नागरिकांनी असा आरोप केला की, केवळ श्रेय घेण्यासाठी उद्घाटनाचा कार्यक्रम घाईघाईत पार पाडण्यात आला आणि त्यानंतर मशीनची वास्तविक स्थिती समोर आली.
या संदर्भात लायड्स मेटल कंपनीचे अधिकारी नटराजन यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, गडचिरोली शहरातील रस्त्यांवर धुळीचे प्रमाण जास्त असल्यामुळे सुरुवातीला सफाई करताना मशीन ज्याप्रमाणे धुळीला टाकीमध्ये खेचून भरल्या जाते त्यावेळेस धुळीचे प्रमाण जास्त असल्यामुळे थोडीफार धूळ उडण्याची शक्यता सुरुवातीलाच राहते,जशी जशी रस्त्यावर बसणारी धूळ कमी होईल त्या हिशोबाने नंतर होणाऱ्या प्रत्येक वेळी सफाईच्या वेळीस धूळ उडताना दिसून येणार नाही, तरीही याव्यतिरिक्त मशीनमध्ये तांत्रिक बिघाड असल्याची माहिती मिळताच कंपनीने तत्काळ दखल घेतली आहे. संबंधित बिघाड लवकरात लवकर दुरुस्त करून मशीन पूर्णपणे कार्यान्वित अवस्थेत नगरपालिकेला सुपूर्द करण्यात येईल. मशीनच्या नियमित देखभाल आणि दुरुस्तीसाठी कंपनीकडे आवश्यक व्यवस्था उपलब्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, नगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आले की, शहरातील स्वच्छता आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक सातत्याने प्रयत्नशील आहेत. नागरिकांनी दाखविलेल्या विश्वासाला तडा जाऊ नये यासाठी नगरपालिका कटिबद्ध असल्याचेही नमूद करण्यात आले.
मात्र उद्घाटनानंतर लगेचच मशीनमध्ये बिघाड आढळल्याने आणि स्वच्छतेऐवजी धूळ उडताना दिसून आल्याने या संपूर्ण प्रकरणाने राजकीय रंग घेतला आहे. विरोधी पक्षासह नागरिकांमध्येही या घटनेबाबत विविध प्रतिक्रिया उमटत असून, स्वच्छतेसाठी आणलेली मशीनच आता वादाचे कारण ठरली आहे.
सध्या शहरवासीयांचे लक्ष मशीनची दुरुस्ती कधी पूर्ण होते आणि ती प्रत्यक्षात प्रभावीपणे स्वच्छतेसाठी वापरली जाते का, याकडे लागले आहे. मात्र या घटनेमुळे स्वच्छता उपक्रमासोबतच राजकीय वातावरणही तापल्याचे चित्र दिसत आहे.




