जारावंडी : शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रम शाळा, जारावंडी येथील अष्टपैलू, कर्तव्यनिष्ठ आणि विद्यार्थ्यांच्या जिव्हाळ्याचे शिक्षक म्हणून ओळख असलेले प्रा. प्रकाश वामनराव वानखेडे हे २५ वर्षांच्या प्रदीर्घ व समर्पित सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याचा गौरव करण्यासाठी शाळेच्या वतीने भावनिक वातावरणात सेवापूर्ती सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक बी. एम. पंधरे होते. प्रमुख अतिथी म्हणून सरपंच सपना ताई कोडापे, उपसरपंच सुधाकर भाऊ टेकाम, रमेशजी दुग्गा, वनपरिक्षेत्र अधिकारी बालाजी दिघोडे, वासुदेवराव कोडापे, मदन भोवते सर, माधुरीताई वानखेडे, जीविका वानखेडे, सुनील वानखेडे, रेखा जांभुळकर, योगेश कुमरे, मुकेश कावळे व दिलीप दास आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शाळेच्या वतीने प्रा. वानखेडे यांचा संपत्नीक शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. त्यांच्या २५ वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसोबतच त्यांच्या नैतिक, सांस्कृतिक व सामाजिक जडणघडणीवरही विशेष भर दिला. ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या अध्यापनशैलीतून अनेक विद्यार्थी घडले असून, आज ते विविध क्षेत्रांत यश संपादन करत आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
मान्यवरांनी आपल्या भाषणातून प्रा. वानखेडे यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांच्या कामाप्रती असलेल्या निष्ठेचे, शिस्तप्रिय स्वभावाचे व सहकाऱ्यांशी जपलेल्या स्नेहपूर्ण नात्याचे कौतुक केले. शाळेच्या प्रगतीत त्यांनी दिलेले योगदान मोलाचे असून, त्यांची उणीव निश्चितच भासेल, असे मत अनेकांनी व्यक्त केले.
सत्कारमूर्ती प्रा. प्रकाश वानखेडे यांनी आपल्या मनोगतातून सेवाकाळातील अनेक आठवणींना उजाळा दिला. या प्रवासात साथ देणारे सहकारी, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व कुटुंबीय यांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले. शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या प्रगतीतच आपले खरे समाधान असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक उच्च माध्यमिक शिक्षक बी. जी. दाऊदसरे यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन माध्यमिक शिक्षक अनिल बारसागडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
प्रा. प्रकाश वानखेडे यांच्या निरोगी, आनंदी आणि समाधानकारक सेवानिवृत्त आयुष्यासाठी उपस्थितांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. हा सेवापूर्ती सत्कार सोहळा उपस्थितांच्या मनात कायम स्मरणात राहील, अशा भावना कार्यक्रमाच्या शेवटी व्यक्त करण्यात आल्या.




