Home ब्रेकिंग न्यूज लॉयड मेटल ने दिलेल्या रोड क्लिनिंग मशीनचे उद्घाटन आपल्या कार्यालयातच करण्याचा स्थानिक...

लॉयड मेटल ने दिलेल्या रोड क्लिनिंग मशीनचे उद्घाटन आपल्या कार्यालयातच करण्याचा स्थानिक आमदारांचा राजहट्ट; भाजपमधील गटबाजीमुळे गडचिरोली शहर विकासावर प्रश्नचिन्ह…

0
965

गडचिरोली, प्रतिनिधी :
गडचिरोली जिल्ह्यात भारतीय जनता पक्षामध्ये सुरू असलेल्या गटबाजीचा परिणाम आता शहराच्या विकासकामांवर होत असल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे. लॉयड मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीकडून सीएसआर निधीतून नगरपालिकेला देण्यात आलेल्या अत्याधुनिक व्हॅक्यूम रोड क्लिनिंग मशीनच्या उद्घाटनावरून निर्माण झालेल्या वादामुळे राजकीय वातावरण तापले आहे.

सीएसआरमधून आधुनिक स्वच्छता यंत्रणा…

शहरातील रस्त्यांवरील काडीकचरा, धूळ व घाण साफ करण्यासाठी कंपनीने मोठ्या वाहनावर बसवलेली आधुनिक व्हॅक्यूम क्लिनर मशीन गडचिरोली नगरपालिकेला उपलब्ध करून दिली आहे. ही मशीन काही दिवसांपूर्वी शहरात दाखल झाली असून स्वच्छता व्यवस्थेला मोठा हातभार लागणार आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे या मशीनची देखभाल, दुरुस्ती, इंधन, चालक व इतर कर्मचाऱ्यांचा संपूर्ण खर्च कंपनीकडून केला जाणार आहे. नगरपालिकेला केवळ समन्वय आणि देखरेखीची जबाबदारी पार पाडायची आहे, यासाठी प्रशासनाने तयारी दर्शविली आहे.

उद्घाटनावरून निर्माण झालेला श्रेयाचा वाद…

मात्र या मशीनच्या उद्घाटनावरून भाजपमधील दोन गटांमध्ये मतभेद उफाळून आल्याची माहिती समोर येत आहे. स्थानिक आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी या मशीनचे उद्घाटन त्यांच्या “कर्तव्य कक्ष” या पक्ष कार्यालयासमोरच व्हावे, असा राजहट्ट धरल्याची चर्चा आहे.
शहरात यामुळे विविध तर्कवितर्कांना उधाण आले असून विकासकामांपेक्षा वैयक्तिक प्रतिष्ठा आणि प्रसिद्धीला अधिक महत्त्व दिले जात आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सहपालकमंत्र्यांच्या बैठकीनंतरही तणाव…

चार दिवसांपूर्वी सहपालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नगरपालिकेच्या विविध अडचणी मांडण्यात आल्या होत्या. त्या वेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हाधिकारी अविश्आयांत पंडा आणि मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर उपस्थित होते.त्यावेळी सहपालकमंत्र्यांनी शहराच्या विकासाबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते.
अशा परिस्थितीत कंपनीकडून मोफत मिळालेल्या या सुविधेवरून राजकीय वाद निर्माण होणे योग्य नसल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

नगरपालिकेची स्पष्ट भूमिका…

या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी संतुलित भूमिका घेतली आहे. “मशीनचे उद्घाटन कुठेही झाले तरी त्याचा वापर गडचिरोलीकरांच्या हितासाठीच होणार आहे. आम्हाला राजकारण करायचे नाही. निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करणे आणि शहराच्या प्रत्येक समस्येचे निराकरण करणे हीच आमची प्राथमिकता आहे,” अशी प्रतिक्रिया नगराध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

विरोधकांचा आरोप…

या प्रकरणामुळे विरोधी पक्षालाही सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची संधी मिळाली आहे. काही विरोधी नगरसेवकांनी आरोप केला आहे की भाजपमधील अंतर्गत गटबाजीमुळे शहराच्या विकासाचे नुकसान होऊ शकते. विकासकामांमध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
एकूणच, सीएसआरमधून मिळालेल्या स्वच्छता मशीनच्या उद्घाटनावरून निर्माण झालेला हा वाद गडचिरोलीतील राजकीय तणाव अधोरेखित करणारा ठरत आहे. आता या प्रकरणाचा पुढील निर्णय काय होणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here