Home ब्रेकिंग न्यूज मोठी बातमी | गडचिरोली–चामोर्शी मार्गावर अपघातांची मालिका, कुनघाडा येथे 6 तास हजारोंचा...

मोठी बातमी | गडचिरोली–चामोर्शी मार्गावर अपघातांची मालिका, कुनघाडा येथे 6 तास हजारोंचा चक्काजाम…

0
964

 

गडचिरोली :

गडचिरोली–चामोर्शी राज्य मार्गावर (क्रमांक ९३५) कुन्घाडा गावाजवळ गेल्या दोन दिवसांत सलग घडलेल्या भीषण अपघातांमुळे नागरिकांचा संताप उफाळून आला आहे. या अपघातांच्या निषेधार्थ आज दुपारी सुमारे १२ वाजल्यापासून कुन्घाडा ग्रामस्थांनी हजारोंच्या संख्येने महामार्गावर उतरून चक्काजाम आंदोलन सुरू केले आहे. आंदोलन अनेक तास सुरू असल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

या परिसरात सुरजागड माइनिंग प्रकल्पाशी संबंधित जड वाहनांची (ट्रक) रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी होत असलेली अवैध पार्किंग आणि बेदरकार वाहनचालना ही अपघातांची मुख्य कारणे असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. वेगात येणाऱ्या वाहनांमुळे सामान्य नागरिकांचे जीव धोक्यात आले असल्याचे चित्र आहे.

दोन दिवसांत दोन अपघात, एकाचा मृत्यू…

परवाच शेतीचे काम आटोपून घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याचा उभ्या ट्रकला धडक बसून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी, म्हणजे काल दुपारी सुमारे १२ वाजताच्या सुमारास, एका कारने रॉंग साईडने येत दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात अतुल कोशमाशिले हा युवक गंभीर जखमी झाला. त्याला प्रथम गडचिरोली जिल्हा शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार देण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये हलविण्यात आले आहे.

१५ लाख रुपयांच्या भरपाईची ठाम मागणी…

सतत घडणाऱ्या अपघातांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे. सुरजागड माइनिंगमध्ये कार्यरत असलेल्या जड वाहनांमुळेच हे अपघात होत असल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी माइनिंग कंपनी लॉयर मेटलने अपघातग्रस्त व मृत व्यक्तीच्या कुटुंबाला १५ लाख रुपयांची आर्थिक भरपाई द्यावी, अशी ठाम मागणी केली आहे. भरपाई जाहीर झाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

मोठा पोलीस बंदोबस्त, तरीही संताप कायम…

परिस्थिती चिघळू नये यासाठी गडचिरोली व चामोर्शी या दोन्ही तहसीलांचा मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी तैनात करण्यात आला आहे. गेल्या चार तासांहून अधिक काळ या मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद असल्याने वाहनचालक व प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.

या आंदोलनस्थळी गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी भेट देऊन पाहणी केली. मात्र, केवळ आश्वासन देऊन जबाबदारी टाळत निघून गेल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून, त्यामुळे नागरिकांचा संताप आणखी वाढल्याचे चित्र आहे.

“जनतेचे जीवन स्वस्त झाले का?” – नागरिकांचा सवाल

सुरजागड माइनिंगमधील जड वाहनांमुळे गडचिरोलीतील नागरिकांचे जीवन स्वस्त झाले आहे का, असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला आहे. पोलीस प्रशासन अपघात रोखण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले जात असले, तरी माइनिंग कंपन्यांच्या वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र रोष कायम आहे.

दरम्यान, प्रशासन व माइनिंग कंपनी यांच्यातील चर्चेकडे सर्वांचे लक्ष लागले असून, आंदोलन कधी मागे घेतले जाणार याबाबत अनिश्चितता कायम आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here