गडचिरोली | दि. १० ऑक्टोबर २०२५
गडचिरोली जिल्ह्यातील पोलिस पाटलांच्या मोठ्या प्रमाणावरील रिक्त पदांची भरती प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी मागणी गावकामगार पोलिस पाटील संघटना, महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा गडचिरोली (नोंदणी क्र. N.S.K./A.N. 2370) यांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
संघटनेने आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, गावपातळीवर पोलिस पाटील हे जनता आणि प्रशासन यांच्यातील एक महत्त्वाचा दुवा म्हणून कार्य करतात. महसूल, पोलिस तसेच विविध शासकीय यंत्रणांना गावातील घडामोडींबाबत आवश्यक गुप्त माहिती ते सातत्याने पुरवतात. मात्र, सन २०२३ पासून जिल्ह्यातील पोलिस पाटलांच्या भरती प्रक्रियेला कोणतीही गती मिळालेली नाही, ही खेदजनक बाब आहे.
सध्या एका पोलिस पाटलाकडे दोन ते तीन गावांचा अतिरिक्त कारभार असल्याने त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण येत आहे. जिल्ह्यात मंजूर पोलिस पाटलांची एकूण संख्या १,५१४ असताना, केवळ ८०० पाटील कार्यरत आहेत — म्हणजेच सुमारे ५० टक्के पदे रिक्त आहेत.
चामोर्शी तालुक्यात भरती प्रक्रिया दोन वेळा राबविण्यात आली असली, तरी निवड झालेल्या उमेदवारांना अद्याप नियुक्ती आदेश देण्यात आलेले नाहीत, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
यावेळी माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांच्या मार्गदर्शनात संघटनेचे अध्यक्ष व सचिव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली की, रिक्त पदांची भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात यावी, ज्यामुळे विद्यमान पाटलांचा कामाचा ताण कमी होईल आणि प्रशासनाचे कामकाज अधिक कार्यक्षम व सुकरपणे पार पाडता येईल.
