Home सामाजिक आदिवासींना “वनवासी” संबोधल्याचा गडचिरोलीत काँग्रेस चा तीव्र निषेध…

आदिवासींना “वनवासी” संबोधल्याचा गडचिरोलीत काँग्रेस चा तीव्र निषेध…

0
35

 

 

गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्याविरोधात आदिवासी नेते आणि काँग्रेस आक्रमक; कुसुम आलाम, माधुरी मडावी व जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजीत गोवेसे यांच्या नेतृत्वात आंदोलन…

 

गडचिरोली, दि. २८ : देशाचे गृहमंत्री Amit Shah यांनी दिल्ली येथे आयोजित एका सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये देशातील आदिवासी समाजाला “वनवासी” असे संबोधल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात संतापाची लाट उसळली आहे. या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज गडचिरोली येथे आदिवासी नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि भारतीय काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार आंदोलन करत गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदविला.

 

या आंदोलनाचे नेतृत्व आदिवासी महिला नेत्या कुसुम आलाम, काँग्रेसच्या महिला नेत्या माधुरी मडावी तसेच भारतीय काँग्रेस पक्षाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष अॅड. विश्वजीत गोवेसे यांनी केले. यावेळी काँग्रेस पक्षाचे शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या तसेच आदिवासी समाजाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

“आदिवासींच्या अस्मितेचा अपमान सहन करणार नाही”

 

आंदोलनादरम्यान नेत्यांनी सांगितले की, आदिवासी समाज हा या देशाचा मूळ निवासी समाज आहे. अशा समाजाला “वनवासी” म्हणून संबोधणे म्हणजे त्यांच्या ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अस्तित्वाचा अपमान आहे.

 

आदिवासी नेत्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, संविधानाने आदिवासी म्हणून मान्यता दिलेल्या समाजाची ओळख बदलण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही. आदिवासी समाजाने जल, जंगल आणि जमीन यांच्या रक्षणासाठी अनेक वर्षे संघर्ष केला असून त्यांच्या ओळखीवर कुठलाही आघात सहन केला जाणार नाही.

 

यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका करताना सांगितले की, देशात संविधानिक मूल्ये आणि आदिवासी समाजाचे अधिकार कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आदिवासींची ओळख बदलून त्यांचा इतिहास आणि अस्तित्व पुसण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला.

 

महिला नेत्या कुसुम अलाम यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, आदिवासी समाजाच्या स्वाभिमानाशी कुठलीही तडजोड केली जाणार नाही. संविधानाने दिलेल्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी आदिवासी समाज आणि काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून संघर्ष करत राहील.

 

आंदोलनादरम्यान शहरातील प्रमुख मार्गांवर निषेध रॅली काढण्यात आली. “आदिवासींचा अपमान बंद करा”, “संविधान बचाव”, “आदिवासींची ओळख कायम ठेवा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

 

काँग्रेस कार्यकर्ते आणि आदिवासी समाजाच्या प्रतिनिधींनी हातात झेंडे आणि फलक घेऊन केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनही सतर्क होते.

 

“आदिवासी समाज आपल्या हक्कांसाठी लढत राहील”

 

आंदोलनाच्या शेवटी जिल्हाध्यक्ष अँड.विश्वजीत कोवासे यांनी इशारा देत सांगितले की, भविष्यातही आदिवासी समाजाला “वनवासी” म्हणून संबोधण्याचा प्रयत्न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल. आदिवासी समाजाची ओळख, अस्मिता आणि संविधानिक अधिकारांच्या रक्षणासाठी संघर्ष सुरूच राहील, असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here