Home ब्रेकिंग न्यूज गडचिरोलीत सामान्य रुग्णालयावर वीज विभागाची मोठी कारवाई; ४ कोटी थकबाकीमुळे पुरवठा आंशिक...

गडचिरोलीत सामान्य रुग्णालयावर वीज विभागाची मोठी कारवाई; ४ कोटी थकबाकीमुळे पुरवठा आंशिक खंडित, कर्मचाऱ्यांत संताप…

0
1210

 

गडचिरोली, 23 मार्च 2026

गडचिरोली जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयासह आठ मोठ्या शासकीय रुग्णालयांवर वीज बिलाची सुमारे ४ कोटी रुपयांची थकबाकी असल्यामुळे वीज विभागाने आज कठोर पाऊल उचलत वीजपुरवठा आंशिक स्वरूपात खंडित केला आहे. या कारवाईमुळे आरोग्य यंत्रणेत एकच खळबळ उडाली असून कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

माहितीनुसार, दीर्घकाळ वीज बिल न भरल्यामुळे वीज विभागाला नाईलाजाने ही कारवाई करावी लागली. मात्र, रुग्णसेवा अबाधित राहावी यासाठी ज्या ठिकाणी प्रत्यक्ष उपचार सुरू आहेत त्या विभागांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आलेला नाही. परंतु रुग्णालय परिसरातील निवासी क्वार्टर्स, काही प्रशासकीय कार्यालये व इतर विभागांची वीज आज बंद करण्यात आली आहे.

या निर्णयानंतर रुग्णालयातील कर्मचारी व अधिकारी संतप्त झाले असून त्यांनी प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला आहे. कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, त्यांच्या राहत्या घरांचे वीज व पाणी बिल दर महिन्याला पगारातून नियमितपणे कपात केले जाते. तरीही अचानक वीजपुरवठा खंडित केल्यामुळे त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

“आमच्या पगारातून रक्कम कपात होत असताना संबंधित बिल वीज विभागाकडे वेळेत का भरले गेले नाही?” असा थेट सवाल कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान, या संदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला असता त्यांनी फोन उचलला नाही. तर अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. छाया उईके यांनी या प्रकरणाची माहिती देण्यास नकार देत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे सांगितले. त्यांच्या या भूमिकेमुळे प्रशासनाच्या पारदर्शकतेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

या घटनेमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्येही नाराजी वाढत असून, ज्यांची कोणतीही चूक नाही अशा कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना या कारवाईचा फटका बसत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता न्यायासाठी कुणाकडे धाव घ्यायची, असा सवाल उपस्थित होत आहे.

मुख्यमंत्र्यांच्या विशेष लक्ष असलेल्या जिल्ह्यात अशा प्रकारची प्रशासकीय ढिसाळपणा समोर येत असल्याने जिल्ह्याच्या प्रतिमेलाही धक्का बसत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. आता शासन या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन कोणती पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here