Home ब्रेकिंग न्यूज कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिसांनी दारूबंदी कायद्याच्या उडवल्या चिंधड्या…ईमानदार पोलिसांची अग्निपरीक्षा…

कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिसांनी दारूबंदी कायद्याच्या उडवल्या चिंधड्या…ईमानदार पोलिसांची अग्निपरीक्षा…

0
2755

दारूच्या नशेत धुंद अवस्थेत दोन पोलीस कर्मचारी रस्त्याच्या कडेला पडले; नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले, कारवाईकडे लक्ष…

गडचिरोली : कायद्याचे रक्षण करणारे पोलीस कर्मचारीच जर दारूच्या नशेत धुंद होऊन रस्त्याच्या कडेला पडलेले आढळले, तर पोलीस विभागाच्या प्रतिष्ठेचे रक्षण कोण करणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. काल रात्री आठवडी बाजार परिसरात अशीच धक्कादायक घटना उघडकीस आली असून पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना दारूच्या नशेत रस्त्याच्या कडेला पडलेल्या अवस्थेत पाहून परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित दोन्ही कर्मचारी दुचाकीवरून या परिसरात आले होते. त्यानंतर परिसरातील एका ठिकाणी अवैधरीत्या विक्री होत असलेली दारू पिऊन त्यांनी पुन्हा दुचाकी घेऊन निघण्याचा प्रयत्न केला. मात्र अतिशय नशेत असल्याने दुचाकीचा तोल जाऊन ते रस्त्याच्या कडेला पडले. दोघांचीही अवस्था इतकी बिघडलेली होती की त्यांना नीट उभे राहणेही शक्य नव्हते.

या वेळी परिसरातील काही नागरिकांनी त्यांना गाडी चालवू नये, अशी विनंती करून थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या दोन्ही कर्मचाऱ्यांनी उलट नागरिकांनाच दमदाटी करत गाडीने उडवून देण्याची धमकी दिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. तसेच “आम्हाला एसपी साहेबांनी सर्चिंगसाठी पाठवले आहे” अशी खोटी माहिती देऊन लोकांना घाबरवण्याचाही प्रयत्न त्यांनी केल्याचे समोर आले आहे.

घटनेची गंभीरता लक्षात घेऊन काही जागरूक नागरिकांनी तत्काळ मोबाईलवरून पोलीस ठाण्यात संपर्क साधून संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर काही वेळातच पोलीस ठाण्यातून चारचाकी वाहन घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले तसेच त्यांची दुचाकीही जप्त करून पोलीस ठाण्यात आणली.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी दोन्ही कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना त्यांची नावे विचारली असता, एकाने आपले नाव राजेंद्र कदम तर दुसऱ्याने हरिदास जाधव असे सांगितले. त्यापैकी हरिदास जाधव याने “मी अतिरिक्त पोलीस अधीक्षक साहेबांचा रायटर आहे, हे लक्षात ठेवा, नाहीतर तुम्हाला पाहून घेईन,” अशी धमकी नागरिकांना दिल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

दरम्यान, या घटनेबाबत माहिती मिळताच संबंधित अधिकाऱ्यांना देखील कळविण्यात आले असून उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनाही याची माहिती देण्यात आली आहे. सध्या दोन्ही कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून त्यांनी मद्यप्राशन केले होते का याची खात्री केली जाणार आहे. तसेच वाहतूक नियमांनुसार ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ प्रकरणातही त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कायद्याची अंमलबजावणी करणारे पोलीस कर्मचारीच जर अशा प्रकारे मद्यधुंद अवस्थेत आढळत असतील, तर पोलीस विभागाची प्रतिमा कशी टिकवायची, वर्दी घालून दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना पाहून इमानदार पोलीस कर्मचाऱ्यांनी बदनामीचा सामना करावा काय असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला असून या प्रकरणात कठोर कारवाई व्हावी, अशी मागणीही जोर धरू लागली आहे. आता या घटनेवर वरिष्ठ पोलीस अधिकारी कोणती कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here