Home शैक्षणिक गोंडवाना विद्यापीठाची बदनामी करणाऱ्या अफवांवर कारवाईचा इशारा; संबंधित माध्यमांना कायदेशीर नोटीस देणार...

गोंडवाना विद्यापीठाची बदनामी करणाऱ्या अफवांवर कारवाईचा इशारा; संबंधित माध्यमांना कायदेशीर नोटीस देणार – कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे.

0
238

 

गडचिरोली :

गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम आणि मागास भागातील गरीब, गरजू तसेच गुणवान विद्यार्थ्यांसाठी गोंडवाना विद्यापीठ हे शिक्षणाचे माहेरघर ठरत आहे. अशा परिस्थितीत विद्यापीठाच्या कार्यप्रणालीबाबत काही माध्यमांतून निराधार व कपोलकल्पित अफवा पसरवून विद्यापीठाची बदनामी करण्याचा प्रयत्न होत असल्याची खंत गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी व्यक्त केली. समाजासाठी ही बाब परवडणारी नसल्याने विद्यापीठाशी संबंधित सर्वांनी संस्थेची प्रतिमा उज्ज्वल राखण्याची जबाबदारी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

गडचिरोली येथील विद्यापीठाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधत होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण आणि परीक्षा नियंत्रक डॉ. पोटदुखे प्रमुख उपस्थित होते.

समाज माध्यमांवर आणि काही माध्यमांमध्ये विद्यापीठाबाबत निराधार माहिती प्रसारित होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कुलगुरूंनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, समाजाच्या सर्वांगीण विकासात शिक्षण देणाऱ्या संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. गोंडवाना विद्यापीठाने अल्पावधीतच उल्लेखनीय प्रगती साधली आहे. विद्यापीठात ई-समर्थ प्रणालीच्या माध्यमातून परीक्षांचे ऑनलाईन नियंत्रण केले जात असून महाराष्ट्रातील मोजक्या विद्यापीठांमध्येच ही आधुनिक व्यवस्था उपलब्ध आहे.

परीक्षांचे मूल्यांकन अत्यंत गोपनीय आणि पारदर्शक पद्धतीने केले जाते. एवढेच नव्हे तर ज्या विद्यार्थ्यांच्या पुनर्मूल्यांकनानंतर गुणांमध्ये बदल होतो, त्या विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकन शुल्क परत देण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशी व्यवस्था केवळ गोंडवाना विद्यापीठात असल्याचे त्यांनी नमूद केले.

कुलगुरू पुढे म्हणाले की, विद्यापीठ हे विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून शैक्षणिक प्रगतीच्या दिशेने यशस्वी वाटचाल करीत आहे. मात्र काही जण हेतुपुरस्सर चुकीची माहिती पसरवून विद्यापीठाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहेत. असे प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

दरम्यान, अलीकडेच काही माध्यमांमध्ये विद्यापीठाच्या विरोधात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांबाबत विद्यापीठ प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. या संदर्भातील सर्व बाबींची सखोल चौकशी करण्यात आली असून, अफवांमध्ये नमूद केलेले आरोप पूर्णपणे कपोलकल्पित असल्याचे स्पष्ट झाल्याचा दावा कुलगुरूंनी केला.

या पार्श्वभूमीवर विद्यापीठाची प्रतिमा मलिन करणाऱ्या आणि चुकीच्या बातम्या प्रसारित करणाऱ्या संबंधित माध्यमांना कायदेशीर नोटीस पाठविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच भविष्यात गोंडवाना विद्यापीठाच्या प्रतिष्ठेला कोणत्याही प्रकारे तडा जाऊ नये यासाठी प्रशासन सतर्क राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मात्र पत्रकार परिषदेदरम्यान माध्यम प्रतिनिधींनी जेव्हा कुलगुरूंना अफवा पसरवणाऱ्या माध्यमांचे किंवा तक्रारदारांचे नाव जाहीर करण्याबाबत विचारणा केली, तेव्हा त्यांनी कोणत्याही व्यक्ती, माध्यम किंवा संस्थेचे नाव जाहीर करण्यास टाळाटाळ केली. ही बाबही पत्रकार परिषदेत विशेषत्वाने चर्चेचा विषय ठरली.

कार्यक्रमाची प्रस्तावना कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी केली, तर आभार प्रदर्शन वर्षा कोल्हे यांनी केले. पत्रकार परिषदेत विद्यापीठाच्या परीक्षा व्यवस्थापन, पारदर्शकता आणि शैक्षणिक प्रगतीबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here