Home ब्रेकिंग न्यूज वैनगंगा नदीच्या पुलाखाली महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ; आत्महत्या की घातपात? पोलिसांचा तपास...

वैनगंगा नदीच्या पुलाखाली महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ; आत्महत्या की घातपात? पोलिसांचा तपास सुरू…

0
2232

 

गडचिरोली :

गडचिरोली शहरातील रामनगर परिसरात राहणाऱ्या ३४ वर्षीय महिलेचा मृतदेह वैनगंगा नदीच्या पुलाखाली पाण्यात आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. तपासणी केली असता सदर महिलेचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मृत महिलेचे नाव कांता अनिल मोहूरले (वय ३४) असे असून ती गडचिरोली शहरातील रामनगर परिसरातील रहिवासी होती. तिचा मृतदेह गडचिरोली शहरापासून सुमारे ११ किलोमीटर अंतरावर असलेल्या वैनगंगा नदीच्या पुलाखाली पाण्यात तरंगताना आढळून आला. स्थानिक नागरिकांनी ही बाब लक्षात येताच पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून मृतदेह बाहेर काढला.

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार कांता मोहरले ही रामनगर परिसरात अवैध दारू विक्री करत असल्याची माहिती समोर आली आहे. तिच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे नोंद असल्याचे सांगितले जात आहे. घटनेपूर्वी ती आपल्या काही महिला सहकाऱ्यांसोबत गडचिरोली शहराच्या पलीकडे वैनगंगा नदी ओलांडून चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेत असलेल्या एका ठिकाणी पार्टीसाठी गेल्याची माहिती मिळाली आहे.

या घटनेमुळे तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. हा प्रकार आत्महत्येचा आहे की त्यामागे कोणता घातपात आहे, याचा तपास पोलिसांकडून विविध अंगांनी करण्यात येत असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. पोस्टमॉर्टेम अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, गडचिरोली मुख्यालयापासून अवघ्या ११ किलोमीटर अंतरावर चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेत असलेल्या काही ठिकाणी अवैध दारू विक्री आणि नशेखोरीचे अड्डे सुरू असल्याचे गंभीर चित्र या घटनेतून पुन्हा समोर आले आहे. अशा ठिकाणांमुळे गडचिरोली परिसरात नशाखोरी वाढत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.

या घटनेनंतर शासकीय यंत्रणा आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून सीमावर्ती भागातील अवैध दारू विक्री आणि नशेखोरीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू केला असून पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here