गडचिरोली | प्रतिनिधी
अबुजमाडच्या घनदाट जंगलात सुरू असलेल्या सुरक्षा दलांच्या नक्षलविरोधी अभियानात मोठी कारवाई समोर आली आहे. घटनास्थळावरून आज सकाळी आणखी दोन माओवादी (एक पुरुष व एक महिला) यांचे मृतदेह हस्तगत करण्यात आले असून आतापर्यंत एकूण तीन माओवादी (दोन पुरुष व एक महिला) ठार झाल्याची अधिकृत माहिती आहे. या माओवाद्यांकडून एके-४७ रायफल व एक एसएलआर अशी घातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. ठार झालेल्या तिन्ही माओवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.
या अभियानादरम्यान C-60 दलाचे जवान दिपक चिन्ना मडावी (वय ३८), सध्या राहणार अहेरी व मूळ रहिवासी मांड्रा, दामरांचा, तालुका अहेरी, हे गंभीर जखमी झाले होते. आज पहाटे अबुजमाडच्या घनदाट जंगलातून त्यांना हेलिकॉप्टरच्या मदतीने उपजिल्हा रुग्णालय, भामरागड येथे दाखल करण्यात आले. मात्र, अभियानादरम्यान झालेल्या गंभीर जखमांमुळे उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. देशसेवेसाठी लढताना त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली असून त्यांना वीरमरण प्राप्त झाले आहे.
दरम्यान, या चकमकीत आणखी एक जवान जोगा मडावी (रा. किष्टयापल्ली) यांना रात्री गोळी लागून जखमी करण्यात आले होते. त्यांनाही तत्काळ हेलिकॉप्टरच्या मदतीने जंगलातून बाहेर काढून भामरागड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून पुढील उपचारांसाठी त्यांना लवकरच हेलिकॉप्टरद्वारे गडचिरोली येथे हलविण्यात येणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान, संबंधित जंगलपरिसरात अद्यापही व्यापक शोध मोहीम सुरू असून संभाव्य माओवादी हालचाली लक्षात घेता सुरक्षा दलांकडून सतर्कता वाढवण्यात आली आहे. या संपूर्ण अभियानाबाबत पुढील सविस्तर माहिती गडचिरोली पोलिसांकडून वेळोवेळी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.




