Home आरोग्य राज्य सरकारने गडचिरोलीत स्वतंत्र कर्करोग निदान रुग्णालय उभारावे – डॉ. प्रणय खुणे...

राज्य सरकारने गडचिरोलीत स्वतंत्र कर्करोग निदान रुग्णालय उभारावे – डॉ. प्रणय खुणे यांची जोरदार मागणी.

0
360

 

गडचिरोली | प्रतिनिधी

दि. ४ फेब्रुवारी २०२६

महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर वसलेला गडचिरोली जिल्हा आजही आरोग्य सुविधांच्या बाबतीत अत्यंत मागासलेला आहे. विशेषतः कर्करोगासारख्या गंभीर आजाराच्या निदान व उपचारासाठी जिल्ह्यात कोणतीही स्वतंत्र सुविधा उपलब्ध नसल्याने येथील शेकडो रुग्णांना नागपूर, चंद्रपूर, हैदराबादसह अन्य जिल्ह्यांत जावे लागत आहे. या प्रक्रियेत गोरगरीब, शोषित व वंचित नागरिकांचा प्रचंड आर्थिक, मानसिक व शारीरिक छळ होत असल्याचे चित्र आहे.

या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात स्वतंत्र कर्करोग निदान रुग्णालयाची तातडीने उभारणी करण्यात यावी, अशी ठाम आणि जोरदार मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटना, महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष डॉ. प्रणय भाऊ खुणे यांनी केली आहे.

डॉ. खुणे यांनी सांगितले की, कर्करोगाच्या निदानासाठी हजारो रुपये खर्च करून बाहेरच्या जिल्ह्यात जावे लागणे ही गडचिरोलीकरांसाठी मोठी शोकांतिका आहे. वेळेवर निदान न झाल्यामुळे अनेक रुग्णांचा जीव धोक्यात येत आहे. त्यामुळे कर्करोगाचे निदान गडचिरोलीतच व्हावे, यासाठी स्वतंत्र कर्करोग निदान रुग्णालय उभारणे ही काळाची नितांत गरज आहे.

या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तसेच कर्करोगाचे वेळीच निदान, प्रतिबंधात्मक उपाय, आरोग्य तपासण्या आणि जनजागृती मोहिमा मोठ्या प्रमाणावर राबविण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णांना केवळ वैद्यकीय उपचारांचीच नव्हे, तर सामाजिक पाठबळ व मानसिक आधाराचीही तितकीच गरज असते. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाने पुढे येऊन कर्करोगमुक्त भविष्यासाठी एकत्रित प्रयत्न करावेत, सुदृढ जीवनशैली अंगीकारावी आणि गडचिरोली जिल्ह्याला अधिक सक्षम व सुदृढ बनवावे, असे आवाहनही डॉ. प्रणय भाऊ खुणे यांनी केले.

गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम जिल्ह्यात स्वतंत्र कर्करोग निदान रुग्णालय उभारणीची ही मागणी आता जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरत असून, याकडे राज्य सरकार लक्ष देणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here