साखेरा जांभळी रोडवर रस्ता बांधकामातील बेदरकारपणाचा बळी;
गडचिरोली :
गडचिरोली–धानोरा राज्य महामार्गावर पोचमार्गावर सुरू असलेल्या रस्ता बांधकामादरम्यान पाणी मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या टँकरने चिरडल्याने १६ वर्षीय शालेय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना धानोरा रोडवरील जांभळी परिसरात दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने संपूर्ण गडचिरोली जिल्हा हादरून गेला असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मृत विद्यार्थिनीचे नाव रिया श्रावण पदा (वय १६) असे असून ती कारवापा येथील रहिवासी होती. रिया ही कारवापा येथील शाळेत शिक्षण घेत होती. शाळा सुटल्यानंतर ती जांभळी मार्गे सायकल ने आपल्या घरी परतत असताना जांभळी गावाच्या सुरुवातीला ही दुर्दैवी घटना घडली.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, रस्ता बांधकामाच्या ठिकाणी पाणी मारण्याचे काम करणारा टँकर चालक दारूच्या नशेत असून बेदरकारपणे, महामार्गासारख्या वेगाने वाहन चालवत होता. याच दरम्यान त्याने नियंत्रण सुटल्याने टँकर थेट रियाच्या अंगावर घातला. या भीषण धडकेत रियाचा जागीच मृत्यू झाला.या अपघातात टँकर वाहनाचे चाक रिया या डोक्यावरून गेल्यामुळे तिचा पूर्ण चेहरा चेंदामेंदा झालेला दिसत होता.
संतप्त नागरिकांकडून चालकाला चोप…
घटनेनंतर परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. मृतदेह पाहताच संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी दारूच्या नशेत असलेल्या टँकर चालकाला पकडून चांगलाच चोप दिला. काही वेळाने पोलीस घटनास्थळी पोहोचले; मात्र तोपर्यंत परिस्थिती चिघळली होती.
सुरक्षा उपायांचा अभाव, सूचनाफलक नाहीत…
घटनास्थळाची पाहणी केली असता रस्ता बांधकाम सुरू असताना कोणतेही धोक्याचे सूचना फलक, दिशा दर्शक चिन्हे किंवा वाहतूक नियंत्रण व्यवस्था आढळून आली नाही. पादचारी व वाहनचालकांसाठी आवश्यक असलेली कोणतीही तांत्रिक सुरक्षा उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
साखेरा जांभळी या रस्त्याच्या बांधकामाचा ठेका डी.सी. गुरुबक्षानी कन्स्ट्रक्शन कंपनी यांना पेटी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने देण्यात आला आहे. नागरिकांचा आरोप आहे की, दारूच्या नशेत वाहन चालवणाऱ्या चालकावरच नव्हे तर अशा चालकाला कामावर ठेवणाऱ्या व सुरक्षा उपाय न राबवणाऱ्या कंत्राटदार कंपनीवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.
महामार्ग विभाग व पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह…??
राज्य महामार्गाचे बांधकाम सुरू असताना महामार्ग पोलीस, वाहतूक पोलीस अथवा परिवहन विभागाकडून कोणतीही प्रभावी नियंत्रण यंत्रणा राबवली जात नसल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. मोठमोठी वाहने बेदरकारपणे धावत असल्याने जिल्ह्यात वारंवार अपघात होत असून, निष्पाप नागरिकांचे जीव जात आहेत.
“लोकांचे जीव स्वस्त झाले आहेत का?”
दररोज दोन ते चार अपघाती मृत्यू होत असतानाही प्रशासन गंभीर भूमिका घेत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र रोष आहे.
“गडचिरोली जिल्ह्यात लोकांचे जीव इतके स्वस्त झाले आहेत का?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या पालकत्वाखालील जिल्ह्यातच जर वाहतूक व सुरक्षिततेची अवस्था अशी असेल, तर जिल्ह्याच्या एकूण सुरक्षेचे तीन तेरा वाजायला वेळ लागणार नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
या घटनेनंतर पोलीस यंत्रणा नेहमीप्रमाणे उशिरा घटनास्थळी पोहोचल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. रिया पदा हिच्या मृत्यूने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.




