Home भ्रष्टाचार शहरातून ओव्हरलोड टिपर धावतातय मोकाट; अपघात घडल्यानंतरच आरटीओ व वाहतूक विभाग जागा...

शहरातून ओव्हरलोड टिपर धावतातय मोकाट; अपघात घडल्यानंतरच आरटीओ व वाहतूक विभाग जागा होणार का?

0
348

 

टिपरची उंची वाढवून ओव्हरलोड वाहतूक; महसूल बुडवणूक आणि नागरिकांच्या जीवाशी खेळ…

गडचिरोली:शहरातून दररोज ओव्हरलोड भरून धावणाऱ्या टिपरमुळे एखादा मोठा अपघात घडल्यानंतरच आरटीओ परिवहन विभाग व पोलीस वाहतूक विभागाचे डोळे उघडणार का, असा संतप्त सवाल शहरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. विशेषतः रेती व गिट्टी वाहतूक करणाऱ्या टिपर वाहनधारकांकडून सर्रासपणे नियमांचे उल्लंघन केले जात असून प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप होत आहे.

जड वाहतूक करणाऱ्या टिपर वाहनांच्या मागील दांड्यांमध्ये बेकायदेशीर बदल करून त्यांची उंची वाढवली जाते. ही उंची वाढवण्यामागील मुख्य हेतू म्हणजे क्षमतेपेक्षा जास्त माल म्हणजेच ओव्हरलोड वाहतूक करणे. या ओव्हरलोडमुळे वाहनधारकांना अतिरिक्त आर्थिक फायदा मिळत असला, तरी शासनाचा मोठ्या प्रमाणावर महसूल बुडत आहे.

उंची वाढवलेल्या टिपरमधून रेती व गिट्टीची वाहतूक करताना मंजूर रॉयल्टीपेक्षा कितीतरी पटीने अधिक साठा नेला जातो. त्यामुळे सरकारी तिजोरीला थेट फटका बसत असून महसूल विभागालाच चुना लावण्याचे प्रकार उघडपणे सुरू आहेत. याशिवाय, ही वाहतूक करताना रस्त्यावर ठिकठिकाणी रेती, गिट्टी सांडली जाते. त्यामुळे मागून येणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांवर दगड, गोटे किंवा जड साहित्य पडून भीषण अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नागरिकांनी याबाबत वारंवार प्रशासनाकडे तोंडी तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे टिपर चालक व वाहनमालकांमध्ये कारवाईची भीतीच उरलेली नाही. जर अशा प्रकारे उंची वाढवलेल्या टिपरमुळे एखादा मोठा अपघात घडला, तर त्याची जबाबदारी आरटीओ परिवहन विभाग व पोलीस वाहतूक विभाग घेणार का, असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, टिपर वाहनांची उंची वाढवण्यासाठी काही वाहनमालकांना आरटीओ परिवहन अधिकाऱ्यांची अप्रत्यक्ष मदत मिळत असल्याची धक्कादायक माहितीही समोर येत आहे. परिवहन अधिकाऱ्यांचे खिसे गरम करून वाहनांमध्ये बेकायदेशीर बदल केले जात असून सरकारच्या महसुलाला मोठा चुना लावण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्याकडूनही या प्रकरणात कारवाई होऊ शकते. मात्र एवढ्या मोठ्या यंत्रणांकडून सातत्याने दुर्लक्ष का केले जात आहे, यावरही नागरिकांकडून संशय व्यक्त केला जात आहे.

आता तरी प्रशासन जागे होऊन उंची वाढवून ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या टिपर वाहनधारकांवर कठोर कारवाई करणार का, की एखादा जीव गेल्यानंतरच कारवाईचे नाटक केले जाणार, असा रोखठोक सवाल संतप्त नागरिक करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here