Home ब्रेकिंग न्यूज मध्यरात्रीपर्यंत सुरू असलेल्या नाट्यप्रयोगावर कारवाई; न्यायिक अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाने प्रयोग बंद, पोलिसांच्या भूमिकेवर...

मध्यरात्रीपर्यंत सुरू असलेल्या नाट्यप्रयोगावर कारवाई; न्यायिक अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाने प्रयोग बंद, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह…?

0
480

 

आरमोरी :

शहरातील बर्डी परिसरात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या नाट्यप्रयोगाच्या कर्कश ध्वनीमुळे नागरिक त्रस्त झाल्याने एका वरिष्ठ न्यायिक अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर पोलिसांनी रात्री सुमारे दोन वाजता नाट्यप्रयोग तात्काळ बंद केला. ही घटना चार दिवसापूर्वी रात्री आरमोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, शहरात चर्चेचा विषय ठरली आहे.

सध्या ग्रामीण भागात मनोरंजनाचे साधन म्हणून कमी खर्चिक नाट्यप्रयोगांचे आयोजन मोठ्या प्रमाणावर केले जात आहे. तसेच ग्रामीण जनतेला आकर्षित करण्यासाठी राजकीय मंडळींकडूनही अशा नाटकांचे आयोजन केले जाते. मात्र, या नाट्यप्रयोगांची सुरुवात बहुतेक ठिकाणी सायंकाळी सात–आठ वाजेपासून अपरिपक्व नृत्य कार्यक्रमांपासून होत असल्याचे चित्र आहे. त्यानंतर रात्री साडेदहा ते अकरा वाजेदरम्यान राजकीय व्यक्तींच्या हस्ते उद्घाटन करण्यात येते. पुढे हे नाट्यप्रयोग रात्री तीन–चार वाजेपर्यंत सलग सुरू राहतात.

ग्रामीण भागात मर्यादित असलेली ही नाट्यसंस्कृती आता आरमोरीसारख्या शहरी परिसरातही पोहोचली असून, त्यामुळे येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः जानेवारी महिन्यापासून दहावी, बारावी, कनिष्ठ महाविद्यालयांसह विविध परीक्षांचे सत्र सुरू असताना, रात्री दोन–तीन वाजेपर्यंत मोठ्या आवाजात साऊंड सिस्टिम सुरू ठेवल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर तसेच नागरिकांच्या शांततेवर गंभीर परिणाम होत आहे.

याच पार्श्वभूमीवर बर्डी परिसरात सुरू असलेल्या ‘बंदीवान’ या नाटकाच्या कर्कश आवाजामुळे त्रस्त झालेल्या शहरातील एका मोठ्या पदावरील न्यायिक अधिकाऱ्यांनी थेट पोलिसांना सूचना केल्यानंतर रात्री दोन वाजता नाट्यप्रयोग बंद करण्यात आला. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.

मात्र, या घटनेनंतर नागरिकांनी रात्रभर चालणाऱ्या नाट्यप्रयोगांवर पोलिस विभागाचे कोणतेही नियंत्रण आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे. नियमांचे उल्लंघन होत असताना वेळेत कारवाई का केली जात नाही, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. त्यामुळे आरमोरी पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनी प्रश्नचिन्ह लावले आहे.

नागरिकांचे म्हणणे आहे की, नाट्यप्रयोगांना परवानगी देताना वेळेची स्पष्ट अट का घातली जात नाही? तसेच पोलिसांच्या सूचनांचे पालन न करणाऱ्या, विशेषतः राजकीय पाठबळ असलेल्या आयोजकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

आजही शहरात आणखी एका नाट्यप्रयोगाचे आयोजन असल्याची माहिती असून, आता तरी पोलिस विभाग या प्रकारावर दक्षता घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here