Home राजकीय गडचिरोली नगर परिषदेला अखेर नवे नेतृत्व… नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांनी पदभार...

गडचिरोली नगर परिषदेला अखेर नवे नेतृत्व… नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांनी पदभार स्वीकारला; महायुती सत्तेतच राहणार – आमदार बंटी भांगडिया.

0
275

गडचिरोली शहराचे सर्वांगीण विकास ही माझी जबाबदारी… अँड.प्रणोती निंबोरकर.

 

गडचिरोली : गडचिरोली नगर परिषदेत दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर गुरुवार, दि. ८ जानेवारी रोजी नव्या नगराध्यक्षांनी अधिकृतपणे सूत्रे हाती घेतली. नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांच्यासह महायुतीमधील नगरसेवकांनी वाजतगाजत नगर परिषदेत प्रवेश करत दुपारी पदभार स्वीकारला.

विशेष म्हणजे भाजपने ही निवडणूक स्वतंत्रपणे लढवली असली, तरी सत्तास्थापनेनंतर आम्ही महायुती म्हणूनच सत्तेत राहणार असल्याचे भाजपचे निवडणूक प्रभारी तथा चिमूरचे आमदार बंटी भांगडिया यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. त्यांच्या या विधानामुळे शहराच्या राजकारणात नव्या समीकरणांबाबत चर्चा सुरू झाली आहे.

डोक्यावर फेटे परिधान करून नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांच्यासह भाजपचे १५ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ५ असे एकूण २० नगरसेवक ढोल-ताशांच्या गजरात नगराध्यक्षांच्या कक्षापर्यंत आले. या भव्य मिरवणुकीमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

या वेळी भाजपचे निवडणूक प्रभारी आमदार बंटी भांगडिया, माजी खासदार व भाजपचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, ज्येष्ठ सहकार नेते प्रकाश सावकार पोरेड्डीवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, माजी जिल्हाध्यक्ष व निवडणूक प्रमुख प्रशांत वाघरे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, प्रमोद पिपरे, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेविका योगिता पिपरे, महिला प्रदेश सचिव रेखा डोळस, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक लिलाधर भरडकर, ज्येष्ठ कंत्राटदार अरुण निंबोरकर, युवा नेते सागर निंबोरकर यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगर परिषदेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांनी नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांचे स्वागत करत त्यांना अधिकृतपणे नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसवले. कार्यालयीन सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर शहरातील विविध क्षेत्रातील नागरिक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. व्यापारी असोसिएशनकडून रवि चन्नावार, मनोज देवकुले, गुरुदेव हरडे  यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, दि. १५ जानेवारी रोजी होणाऱ्या नगर परिषदेच्या बैठकीत उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांची निवड केली जाणार आहे. त्यानंतर होणाऱ्या पुढील सभेत विषय समित्यांच्या सभापतींची निवड होणार असल्याने, कोणाकोणाला संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गडचिरोलीच्या राजकारणात पुढील काही दिवसांत महत्त्वपूर्ण घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here