गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील ढासळलेली आरोग्य व्यवस्था आणि दयनीय पायाभूत सुविधांविरोधात आज काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरातील इंदिरा गांधी चौकात जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते, पदाधिकारी तसेच शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचे आश्वासन दिले असले, तरी प्रत्यक्षात गडचिरोलीतील आरोग्य व्यवस्था व रस्ते यांची अवस्था अत्यंत चिंताजनक असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. अपुऱ्या आरोग्य सेवा आणि खड्डेमय रस्त्यांमुळे जिल्ह्यातील गोरगरीब, कष्टकरी व आदिवासी नागरिकांचे जीव धोक्यात आले असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
दुर्गम व ग्रामीण भागांतील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय असून वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे नुकतीच एका गरोदर मातेचा व तिच्या नवजात बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. ही घटना शासन व प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे जिवंत उदाहरण असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला. “मुख्यमंत्री यांच्या जिल्ह्यातच नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे,” असा घणाघाती आरोप आंदोलनादरम्यान करण्यात आला.
आंदोलनाच्या समाप्तीनंतर काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था तात्काळ सक्षम व सुसज्ज करावी, अतिदुर्गम भागांना जोडणारे दर्जेदार रस्ते त्वरित विकसित करावेत, तसेच मृत गरोदर मातेच्या कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत देऊन न्याय द्यावा, अशा ठोस मागण्या करण्यात आल्या आहेत.
जर शासनाने तातडीने लक्ष घालून ठोस निर्णय घेतले नाहीत, तर भविष्यात आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा इशाराही काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे. गडचिरोलीतील नागरिकांना मूलभूत सुविधा केव्हा मिळणार, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.




