Home शैक्षणिक अहेरीतील विद्यार्थ्यांसाठी भामरागड येथे निशुल्क शैक्षणिक सहल; दृष्टी फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम, शाहीन...

अहेरीतील विद्यार्थ्यांसाठी भामरागड येथे निशुल्क शैक्षणिक सहल; दृष्टी फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम, शाहीन हकीम यांच्या पुढाकारातून शिक्षणाला नवे आयाम…

0
113

 

अहेरी :

ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी शिक्षणापुरते मर्यादित न ठेवता निसर्ग, इतिहास, संस्कृती व समाजसेवेची प्रत्यक्ष ओळख व्हावी, या उदात्त उद्देशाने दृष्टी फाउंडेशनच्या वतीने अहेरी शहरातील विद्यार्थ्यांसाठी भामरागड येथे एकदिवसीय निशुल्क शैक्षणिक सहलीचे भव्य आयोजन करण्यात आले. दृष्टी फाउंडेशनच्या अध्यक्ष शाहीन ताई हकीम यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आल्याने सर्व स्तरांतून त्याचे कौतुक होत आहे.

या शैक्षणिक सहलीत अहेरी शहरातील विविध शाळांमधील मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सहलीची सुरुवात हेमलकसा येथील प्रसिद्ध लोक बिरादरी प्रकल्पाच्या भेटीने झाली. येथे विद्यार्थ्यांनी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे व त्यांच्या कुटुंबीयांनी आदिवासी भागात केलेल्या आरोग्य, शिक्षण व सामाजिक कार्याची माहिती घेतली. समाजसेवा, मानवता आणि समर्पणाचे जिवंत उदाहरण प्रत्यक्ष पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना यावेळी मिळाली.

यानंतर विद्यार्थ्यांनी भामरागड येथील ऐतिहासिक त्रिवेणी संगमाला भेट दिली. घनदाट जंगल, निसर्गरम्य डोंगररांगा, नद्या व परिसरातील जैवविविधता यांचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. स्थानिक आदिवासी संस्कृती, जीवनपद्धती, परंपरा व लोककलेची प्रत्यक्ष ओळखही या सहलीतून विद्यार्थ्यांना मिळाली.

मार्गदर्शन करताना शिक्षकांनी भामरागडचा ऐतिहासिक वारसा, भौगोलिक वैशिष्ट्ये, आदिवासी संस्कृतीचे महत्त्व तसेच पर्यावरण संवर्धनाची गरज याबाबत विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली. प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांचे ज्ञान अधिक समृद्ध झाले. अनेक विद्यार्थ्यांसाठी ही पहिलीच शैक्षणिक सहल असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद, कुतूहल आणि समाधान स्पष्टपणे दिसून येत होते.

अभ्यासासोबतच अशा शैक्षणिक सहली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात, असे मत यावेळी उपस्थित शिक्षक, पालक व मान्यवरांनी व्यक्त केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, पर्यावरणाबद्दलची संवेदनशीलता आणि आत्मविश्वास वाढतो, असेही त्यांनी नमूद केले.

दृष्टी फाउंडेशनतर्फे शिक्षण, आरोग्य व सामाजिक विकासासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविले जात असून, भविष्यातही विद्यार्थ्यांसाठी अधिकाधिक शैक्षणिक, सांस्कृतिक व प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात येणार असल्याची ग्वाही दृष्टी फाउंडेशनच्या अध्यक्ष शाहीन ताई हकीम यांनी दिली.

ही शैक्षणिक सहल यशस्वी होण्यासाठी शिक्षकवृंद, स्वयंसेवक व पालकांनी मोलाचे सहकार्य केले. दृष्टी फाउंडेशनच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, अहेरीतील विद्यार्थ्यांसाठी ही शैक्षणिक सहल निश्चितच प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरल्याची भावना व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here