Home विशेष विकासाच्या बाता हवेतच; गडचिरोलीत विद्यार्थ्यांचा बससेवेअभावी रोजचा संघर्ष लज्जास्पद…

विकासाच्या बाता हवेतच; गडचिरोलीत विद्यार्थ्यांचा बससेवेअभावी रोजचा संघर्ष लज्जास्पद…

0
219

 

गडचिरोली :

गडचिरोलीच्या विकासाच्या मोठमोठ्या गप्पा मुंबई–दिल्लीपर्यंत मारल्या जात असताना, प्रत्यक्षात मात्र जिल्ह्यातील विद्यार्थी व सर्वसामान्य प्रवाशांना पुरेशा बससेवेअभावी दररोज होणारा त्रास प्रशासनाच्या अपयशाचे विदारक चित्र उघड करत आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाही आजही येथे आरोग्य, रस्ते, शिक्षण आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णतः ढासळलेली असल्याचे वास्तव समोर येत आहे. विकासाच्या घोषणांचा पाऊस पडत असताना, सामान्य नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे मात्र सातत्याने दुर्लक्ष होत आहे.

विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील शाळकरी विद्यार्थी दररोज शाळेत जाण्यासाठी बसस्टॉपवर तासन्‌तास ताटकळत उभे राहत असल्याचे चित्र दिसून येते. वेळेवर बस न मिळाल्याने अनेक विद्यार्थ्यांना शाळेत उशिरा पोहोचावे लागते, तर शाळा सुटल्यानंतर घरी परतण्यासाठीही मोठा विलंब सहन करावा लागतो. याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर, आरोग्यावर आणि मानसिक स्थितीवर होत आहे.

बससेवेच्या अभावामुळे प्रवाशांनाही मोठ्या मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याच सततच्या त्रासाला कंटाळून गडचिरोली–आरमोरी राष्ट्रीय महामार्गावरील पोर्ला येथे विद्यार्थ्यांनी रास्ता रोको आंदोलन करत आपल्या वेदना रस्त्यावर मांडल्या. विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ येणे हे अत्यंत दुर्दैवी आणि लज्जास्पद आहे.

दररोज भेडसावणाऱ्या या गंभीर समस्येकडे लोकप्रतिनिधी गांभीर्याने लक्ष देत नसल्याचेच चित्र स्पष्टपणे दिसत आहे. गडचिरोलीच्या विकासाची स्वप्ने दाखवणाऱ्यांनी मात्र येथील नागरिकांना भेडसावणाऱ्या दैनंदिन प्रश्नांकडे कधीच गंभीर दखल घेतली नाही, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

मुख्यमंत्री पालकत्व असलेल्या जिल्ह्यातील प्रश्न चुटकीसरशी सुटायला हवेत; मात्र गडचिरोलीत याच्या अगदी उलट परिस्थिती आहे. बससेवेअभावी विद्यार्थ्यांचा होणारा आक्रोश पालकमंत्री असलेले मुख्यमंत्री कधी ऐकणार? आणि लोकप्रतिनिधी या गंभीर प्रश्नाकडे कधी गांभीर्याने पाहणार? असा थेट प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here