Home सामाजिक कमलापूर परिसरातील 80 ग्रामसभांची भव्य संयुक्त बैठक; जल–जंगल–जमिनीच्या हक्कांवर सखोल चर्चा…

कमलापूर परिसरातील 80 ग्रामसभांची भव्य संयुक्त बैठक; जल–जंगल–जमिनीच्या हक्कांवर सखोल चर्चा…

0
145

 

अहेरी:अहेरी तालुका अंतर्गत येणाऱ्या ताटीगुडम (कमलापूर) येथे दि. 14 डिसेंबर 2025 रोजी कमलापूर परिसरातील तब्बल 80 ग्रामसभांची एकत्रित भव्य बैठक संपन्न झाली. या बैठकीत ग्रामसभांच्या हक्क, अधिकार आणि संघटन बळकटीकरणावर सखोल चर्चा करण्यात आली.

 

या संयुक्त बैठकीत जिल्हा महा ग्रामसभा, तालुका महा ग्रामसभा आणि इलाका महा ग्रामसभा या संघटना कशा पद्धतीने संघटित कराव्यात, त्यांची भूमिका काय असावी, यावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच ग्रामसभांना प्राप्त होणाऱ्या गौण वनउपजाच्या (टी.पी.) व्यवस्थापनाबाबत सविस्तर चर्चा झाली.

 

तेंडुपत्ता, बांबू व इतर गौण वनउपजांच्या पारदर्शक लिलाव प्रक्रियेवर, उत्पन्न थेट ग्रामसभांना मिळावे, यासाठी आवश्यक उपाययोजना काय असाव्यात, यावर उपस्थितांनी आपली मते मांडली. यासोबतच पेसा कायदा, सामूहिक वनहक्क, तसेच जल–जंगल–जमिनीवरील वैयक्तिक व सामूहिक हक्कांचे पट्टे प्रलंबित प्रकरणे यावरही सखोल चर्चा करण्यात आली.

 

या बैठकीदरम्यान डॉ. देवाजी तोफा, शिवाजी नरोटे, नितीन पदा व बाजीराव उसेंडी यांनी ग्रामसभा प्रतिनिधींना मार्गदर्शन केले. ग्रामसभांचे अधिकार मजबूत करण्यासाठी एकत्रितपणे लढा उभारण्याचे आवाहन त्यांनी केले.

 

या बैठकीमुळे कमलापूर परिसरातील ग्रामसभांमध्ये संघटनात्मक बळ वाढून, आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी नव्या दिशेने पावले पडतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here