Home विशेष इंदिरा गांधी चौकात अपघातांची मालिका; भरधाव पिकअपची मोपेड ला धडक…, सामान्य रुग्णालयातील...

इंदिरा गांधी चौकात अपघातांची मालिका; भरधाव पिकअपची मोपेड ला धडक…, सामान्य रुग्णालयातील सुरक्षा रक्षक गंभीर जखमी… एकाच दिवशी दोन अपघात, वाहतूक पोलिसांच्या कार्यप्रणालीवर गंभीर आरोप…?

0
1693

 

 

गडचिरोली : शहरातील वाहतुकीचा बोजवारा उडाल्याचे पुन्हा एकदा समोर आले असून, आज सकाळी गडचिरोलीच्या गजबजलेल्या इंदिरा गांधी चौकात झालेल्या भीषण अपघाताने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गडचिरोली सामान्य रुग्णालयात कार्यरत असलेले सुरक्षा रक्षक सचिन बाणबुले हे स्कुटीवरून नोकरीच्या ठिकाणी जात असताना, भरधाव वेगातील पिकअप वाहन (क्रमांक MH33T5698) ने त्यांना जोरदार धडक दिली. ही घटना सकाळी सुमारे 8 वाजताच्या सुमारास घडली.

धडक दिल्यानंतर पिकअप वाहनाचा चालक गर्दी वाढताना पाहून ‘लोक मारतील’ या भीतीने गाडी बाजूला घेत असल्याचे सांगत घटनास्थळावरून आपली गाडी घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या सचिन बाणबुले यांना तत्काळ ऑटो रिक्षाच्या मदतीने गडचिरोली सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 

रुग्णालयीन सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन यांच्या कमरेच्या हाडाला तसेच मांडीच्या सांध्याजवळ फ्रॅक्चर झाले असून, शरीराच्या दोन ठिकाणी हाडे मोडली आहेत. याशिवाय पायाच्या तळव्याजवळ मोठी जखम आहे. सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असली तरी, पुढील दोन ते तीन महिने त्यांना पूर्णपणे बेडरेस्टवर राहावे लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सदर फ्रॅक्चरवर शस्त्रक्रिया किंवा प्लास्टर करणे शक्य नसून, फक्त कंबर व पायाला पट्टा बांधून हालचाल रोखणे आणि औषधोपचार हाच पर्याय असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

 

दरम्यान, याच ठिकाणी काही वेळातच दुसरा अपघात घडला. सुरजागड खनिज वाहतूक करणाऱ्या एका ट्रकने दुचाकीस्वाराला समोरून धडक दिल्याने तोही गंभीर जखमी झाला. धक्कादायक बाब म्हणजे, जखमी दुचाकीस्वाराला मदत करण्याऐवजी, पोलिसांनी त्यालाच दोषी ठरवत ट्रक चालकाला घटनास्थळावरून जाण्यास मदत केल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. काही वाहतूक पोलिसांकडे ट्रकचा नंबर व चालकाचे नाव विचारले असता ‘माहित नाही’ असे उत्तर दिल्याचेही सांगण्यात आले.

 

सुरजागड वाहतुकीतील जड वाहनांमुळे अपघात वाढत असून, मोठ्या वाहनांना अप्रत्यक्ष मदत केली जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून होत आहे. अवघ्या चार दिवसांपूर्वी ट्रकच्या धडकेत कार्मेल शाळेच्या शिक्षिका ममता बांबोळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्या घटनेची जखम ताजी असतानाच, आज एकाच दिवसात दोन अपघात घडल्याने संताप व्यक्त होत आहे.

 

गडचिरोली शहरातील स्थानिक वाहतूक विभागात एक सहाय्यक पोलिस निरीक्षक अधिकाऱ्यांसह 35 च्या वर कर्मचाऱ्यांची संख्या असताना सुद्धा वाहतूक नियंत्रण पूर्णपणे कोलमडल्याचे चित्र आहे.

तसेच महामार्ग वाहतूक पोलिसांची यंत्रणा अस्तित्वात असतानाही अपघात थांबत नसल्याने, त्यांच्या कार्यप्रणालीवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. महामार्ग वाहतूक विभागात 13 कर्मचारी व दोन अधिकारी नियुक्त असतानाही, मागील दीड-दोन वर्षांपासून प्रत्यक्ष काम न करता दीडपट वेतन घेत असल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. काही कर्मचाऱ्यांनी प्रामाणिक प्रभारी अधिकाऱ्याविरोधात संघटनेच्या माध्यमातून तक्रारी करून त्यांना हटविण्याचा कट रचल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

 

या पार्श्वभूमीवर, महामार्ग वाहतूक विभागाचे नियंत्रण स्थानिक पोलीस अधीक्षकांकडे द्यावे किंवा गडचिरोलीत स्वतंत्र महामार्ग पोलीस कार्यालय सुरू करावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

 

शहरातील अतिक्रमण, रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकी-चारचाकी वाहने आणि जड वाहनांची बेफिकीर वाहतूक ही अपघातांची मुख्य कारणे ठरत असल्याचेही स्पष्ट होत आहे. विद्यार्थी, शासकीय कर्मचारी, नोकरदार वर्ग आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणारी ही वाहतूक व्यवस्था तातडीने सुधारावी, अशी एकमुखी मागणी गडचिरोलीकरांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here