गडचिरोली/ हैदराबाद | दि. 30 नोव्हेंबर 2025
हैदराबाद येथील FTCCI कन्व्हेन्शन हॉलमध्ये आयोजित भव्य समारंभात सामाजिक कार्यकर्ते रोशन मसराम यांना मानद डॉक्टरेट उपाधीने सन्मानित करण्यात आले. जी.एच.आर.टी. इंटरनॅशनल इंडिया (भारत सरकार संलग्न नीती आयोग), एशियन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी (AIU), तसेच युनायटेड नेशन ऑफ इकॉनॉमिक अँड सोशल अफेअर्स, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने हा सन्मान प्रदान करण्यात आला.
या समारंभाला प्रमुख पाहुण्या म्हणून तेलंगणा जैवविविधता मंडळाच्या ब्रँड अँबेसिडर श्रीमती सुषमा मुपीट्टी, GHTR इंडिया चे एच.आर. रहमान, तेलंगणाचे खासदार रवीजी मल्लू, अफगाणिस्तानचे कार्यवाहक महावाणिज्यदूत मुजीबुर रहमान, श्रीलंकेचे डॉ. बी. पी. संमेन परेरा, शिक्षणतज्ज्ञ (तामिळनाडू) डॉ. टी. अरुल राज, केरळचे ‘यंग नॅशनल आयकॉन ऑफ द इयर’ डॉ. आयझॅक जान जोसेफ, महाराष्ट्रातील उद्योगपती व एक्सिम सल्लागार डॉ. विजयानंद साळवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या वेळी देशातील विविध राज्यांतून आपल्या-आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना मानद डॉक्टरेट उपाधी बहाल करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यातील रोशन मसराम हे उच्चशिक्षित असून गेल्या 21 वर्षांपासून आदिवासी व दुर्गम भागांत सातत्याने सामाजिक कार्य करत आहेत. मानसिक आरोग्य सुधारणा, रक्तदान चळवळ, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, युवकांना आत्मिक बळ देणे, महिलांमध्ये न्याय व हक्कांविषयी जनजागृती अशा विविध मानवतावादी उपक्रमांद्वारे त्यांनी समाजावर सकारात्मक व शाश्वत प्रभाव निर्माण केला आहे.
सन 2025 मध्ये AIU कडून प्रत्यक्ष क्षेत्रीय तपासणी (प्रॅक्टिकल व्हेरिफिकेशन) करून त्यांच्या कार्याची सखोल दखल घेण्यात आली. निस्वार्थ समाजसेवा, सातत्य, आणि नैराश्यातून आशेकडे वाटचाल करण्यास प्रेरणा देणारे कार्य यांचे जिवंत उदाहरण म्हणून रोशन मसराम यांची निवड करून भारत सरकार संलग्न मानद डॉक्टरेट उपाधी प्रदान करण्यात आली.
या सन्मानामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या सामाजिक कार्यक्षेत्राला नवी ओळख मिळाली असून, डॉ. रोशन मसराम यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




