गडचिरोली –
नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी निश्चित उमेदवार म्हणून गेल्या महिनाभरापासून चर्चेत असलेल्या आणि मोठ्या गाजावाजात काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या कविता सुरेश पोरेड्डीवार यांनी आज अचानक अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल करून काँग्रेस पक्षात मोठा राजकीय भूकंप घडवून आणला आहे. नगरपालिकेच्या वतीने या माहितीची पुष्टी करण्यात आली आहे.
महिनाभर चर्चेत असलेली ‘100% खात्रीची उमेदवारी’
गेल्या एका महिन्यापासून गडचिरोली शहरात एकच चर्चा होती की “नगराध्यक्ष पदाचे तिकीट कविता पोरेड्डीवार यांनाच मिळणार!” परंतु आज त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शंका कुशंका व्यक्त केली जात असल्याचे दिसून आले होते.
कविता पोरेड्डीवार यांनी नुकताच शेकडो राष्ट्रवादी कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला होता. त्यांच्या पक्षप्रवेशाला काँग्रेसचे राज्याध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वतः उपस्थित राहून मान्यता दिल्याने तिकीट निश्चित असल्याचे वातावरण अधिकच दृढ झाले होते.
अपक्ष अर्ज भरताना मोजकेच कार्यकर्ते; गटबाजीची चर्चा चव्हाट्यावर…
आज दुपारी कविता पोरेड्डीवार यांनी अपक्ष फॉर्म भरताना त्यांच्या सोबत फक्त काही मोजकेच कार्यकर्ते असल्याचे दिसून आले.
पूर्वीच्या तुलनेत कार्यकर्त्यांची कमी उपस्थिती पाहून काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत गटबाजीचे समीकरण आता उघडपणे येऊ लागले आहे, अशी चर्चा शहरभर सुरू झाली.काँग्रेसमधील काही गटांनी त्यांच्याविरुद्ध वातावरण तयार करून तिकीट न देण्याचा प्रयत्न केला, अशीही कुजबुज ऐकू येत आहे.
काँग्रेसचे बदलते गणित — ‘नवीन उमेदवाराची शक्यता!’
कविता पोरेड्डीवार यांनी अपक्ष अर्ज भरताच काँग्रेसचे गणित बदलले आहे.
काही ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी नवीन चेहरा उमेदवार म्हणून पुढे करण्याची चर्चा सुरू केली असून पक्षाकडून तातडीने निर्णय होण्याची शक्यता आहे.यामुळे पक्षातील असंतोष अधिकच वाढला आहे.
वीस वर्षांची सत्ता, विकास न झाल्याची नाराजी आणि नागरिकांचा रोष…
वीस वर्षे नगरपालिकेत सत्ता भोगणारे सुरेश पोरेड्डीवार (कवितांचे पती) यांच्या कार्यकाळात समाधानकारक विकास न झाल्याची नाराजी नागरिकांमध्ये आहे.
त्याच पार्श्वभूमीवर पोरेड्डीवार दाम्पत्याने काँग्रेसकडून उमेदवारी मिळवून पुन्हा सत्तेत येण्याचा प्रयत्न सुरू केल्याची टीका काही ज्येष्ठ नेत्यांकडून व्यक्त होत आहे.
काँग्रेसमधील जुन्या कार्यकर्त्यांनी “पक्षाने उमेदवारी बदलल्यास काहीतरी बदल घडू शकतो”असा सूर लावल्याची माहिती मिळाली आहे.
काँग्रेसमध्ये संभ्रम, आगामी निवडणुकीत नवे वळण?
कविता पोरेड्डीवार यांच्या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसमध्ये तीव्र संभ्रम निर्माण झाला आहे.
आता पक्षाकडून नवीन उमेदवार दिला जाणार का?अपक्ष म्हणून कविता पोरेड्डीवार किती प्रभाव पाडतील..? यावर संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.




