Home सामाजिक रेव्हेन्यू कॉलनीत विकासकामांचा शुभारंभ; नगराध्यक्षांकडून दर्जा आणि पारदर्शकतेची ग्वाही…

रेव्हेन्यू कॉलनीत विकासकामांचा शुभारंभ; नगराध्यक्षांकडून दर्जा आणि पारदर्शकतेची ग्वाही…

0
134

 

गडचिरोली :

शहरातील चंद्रपूर रोड परिसरातील रेव्हेन्यू कॉलनीमध्ये विविध विकासकामांचा आज विधिवत शुभारंभ करण्यात आला. नगराध्यक्ष ॲड. प्रणोती निंबोरकर यांच्या हस्ते भूमिपूजन करून या कामांची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी बोलताना नगराध्यक्षांनी सर्व विकासकामे उच्च दर्जाची, पारदर्शक पद्धतीने आणि आवश्यक शासकीय व कायदेशीर प्रक्रियेचे काटेकोर पालन करून पूर्ण केली जातील, अशी ठाम ग्वाही दिली.

त्या पुढे म्हणाल्या की, वार्डातील नागरिकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन दीर्घकालीन आणि टिकाऊ विकासकामांना प्राधान्य दिले जाईल. या कामांमुळे स्थानिक नागरिकांना मूलभूत सुविधा अधिक सक्षमपणे उपलब्ध होतील आणि परिसराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल. नगर परिषद ही नेहमीच नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर असून विकासकामांमध्ये कोणतीही हलगर्जी सहन केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमाला बांधकाम सभापती अनिल कुनघाडकर, पाणीपुरवठा सभापती लीलाधर भरडकर यांच्यासह वार्डातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान संबंधित विकासकामांचा माहितीफलक अनावरण करण्यात आला. तसेच पारंपरिक पद्धतीने कुदळ चालवून भूमिपूजन करत कामांची औपचारिक सुरुवात करण्यात आली.

विकासकामांच्या शुभारंभामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. नागरिकांनी नगर परिषदेबद्दल विश्वास व्यक्त करत या कामांमुळे रेव्हेन्यू कॉलनीसह संपूर्ण परिसराच्या विकासाला नवी गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here