गडचिरोली, दि. ०२ एप्रिल २०२६ :
गोंडवाना विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित व न्यायोचित मागण्यांसाठी २४ मार्च २०२६ पासून सुरू असलेले आंदोलन सध्या तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. कर्मचारी व अधिकारी संघटनांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर २३ मार्च २०२६ रोजी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची कुलगुरू, प्र-कुलगुरू आणि कुलसचिव यांच्यासोबत बैठक पार पडली होती. मात्र, त्या बैठकीच्या इतिवृत्तामध्ये मोठ्या प्रमाणात विसंगती व विरोधाभास आढळून आल्याने संघटनांनी तीव्र निषेध नोंदवत कुलगुरूंना लेखी निवेदन सादर केले होते.
कर्मचाऱ्यांमधील वाढत्या नाराजीमुळे आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक आक्रमक भूमिका घेत धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला मिळालेला मोठा प्रतिसाद आणि कर्मचाऱ्यांची ठाम एकजूट पाहता विद्यापीठ प्रशासनाने पुन्हा चर्चेसाठी पुढाकार घेतला.
यानंतर झालेल्या चर्चेनंतर पूर्वीचे इतिवृत्त रद्द करून सुधारित इतिवृत्त संघटनांना देण्यात आले. या सुधारित इतिवृत्तात कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्यांबाबत प्रशासनाचा सकारात्मक दृष्टिकोन स्पष्ट करण्यात आला असून त्यास लेखी आश्वासनही देण्यात आले आहे.
कुलगुरू व प्र-कुलगुरू यांनी मागण्या मान्य करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे लेखी निवेदन देत आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य स्वप्नील दोन्तुलवार, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मनोज जाधव, उपाध्यक्ष महादेव वासेकर, सचिव सतीश पडोळे तसेच अधिकारी संघटनेचे अध्यक्ष संदेश सोनुले, सहसचिव प्रमोद बोरकर आणि सदस्य कृष्णा देवीकर उपस्थित होते.
यानंतर दोन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन प्रत्येक मागणीवरील कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. चर्चेनंतर पुढीलप्रमाणे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले:
कुलगुरूंच्या अधिकारातील व प्रशासकीय स्तरावरील मागण्यांसाठी ७ दिवसांची मुदत
व्यवस्थापन परिषदेच्या अधिकारातील मागण्यांसाठी १५ दिवसांची मुदत
निर्धारित कालावधीत मागण्यांची पूर्तता किंवा ठोस कार्यवाही न झाल्यास, सोळाव्या दिवसापासून आंदोलन अधिक तीव्र स्वरूपात पुन्हा सुरू करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे.
सध्या आंदोलन प्रशासनाला आवश्यक कालावधी देण्याच्या उद्देशाने स्थगित करण्यात आले असले तरी ते पूर्णतः मागे घेतलेले नाही. आवश्यकतेनुसार ते पुन्हा सुरू करण्यात येईल, अशी भूमिका संघटनांनी स्पष्ट केली आहे.
या संपूर्ण आंदोलनादरम्यान सुरुवातीला प्रशासनाची भूमिका नकारात्मक होती. मात्र, कर्मचाऱ्यांच्या ठाम भूमिकेमुळे व एकजुटीमुळे प्रशासनाला आपली भूमिका बदलावी लागली आणि लेखी आश्वासन द्यावे लागले. त्यामुळे हे आंदोलन अंशतः यशस्वी ठरल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, आंदोलनाच्या काळात काही महत्त्वाच्या मागण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये शासकीय सुट्टीच्या दिवशी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पर्यायी रजा देण्याबाबत परिपत्रक जारी करणे तसेच कार्यक्षम नसलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द करणे यांचा समावेश आहे.
उर्वरित मागण्यांबाबत सकारात्मक लेखी आश्वासन मिळणे हे देखील संघटनांच्या लढ्याचे मोठे यश असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या आंदोलनात सक्रिय सहभाग, एकजूट आणि सातत्यपूर्ण पाठिंबा दिल्याबद्दल सर्व कर्मचारी बंधू-भगिनींचे आभार व्यक्त करण्यात आले असून, मिळालेल्या यशाबद्दल सर्वांचे अभिनंदन करण्यात आले आहे.




