Home सामाजिक अपघाताची वाट पाहते का प्रशासन? जिर्ण व अरुंद पुलामुळे नागरिकांच्या जीवितास धोका;...

अपघाताची वाट पाहते का प्रशासन? जिर्ण व अरुंद पुलामुळे नागरिकांच्या जीवितास धोका; तातडीने नवीन पुलाची मागणी…

0
213

 

चामोर्शी / प्रतिनिधी : तालुक्यातील फोकुर्डी – नवेगाव – मुरखडा या महत्त्वाच्या मार्गावरील दिनाधरण नहरावर बांधलेला पूल सध्या अत्यंत जिर्ण अवस्थेत असून, या पुलामुळे स्थानिक नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. पूल अरुंद आणि आडव्या वळणावर असल्याने वाहनचालकांसाठी हा मार्ग अत्यंत धोकादायक ठरत असून, प्रशासन मात्र या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे.

सदर पुलाच्या दुरुस्तीबाबत संबंधित विभागाकडे अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, आजतागायत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. दिवसेंदिवस पुलाची अवस्था अधिकच खालावत चालली असून, मोठा अपघात घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

विशेषतः दुचाकीस्वारांना या पुलावरून जाताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पुलाची रुंदी अत्यंत कमी असल्यामुळे आणि त्यावर आडवे वळण असल्यामुळे वाहनांचा तोल जाण्याची शक्यता अधिक असते. यापूर्वी काही दुचाकीस्वार नहरात कोसळून अपघात झाल्याच्या घटना घडल्या असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

फोकुर्डी – नवेगाव – मुरखडा हा मार्ग स्थानिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून, शेतकरी, विद्यार्थी तसेच दैनंदिन कामासाठी ये-जा करणारे नागरिक मोठ्या प्रमाणात या मार्गाचा वापर करतात. मात्र पुलाच्या जिर्ण अवस्थेमुळे हा मार्ग आता ‘अपघातप्रवण ठिकाण’ बनत चालल्याची चर्चा आहे.

या पार्श्वभूमीवर या परिसरातील नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. “मोठी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता या पुलाची तातडीने दुरुस्ती करावी किंवा नवीन व रुंद पुलाचे बांधकाम करण्यात यावे,” अशी मागणी त्यांनी केली आहे.

तसेच, वेळेत योग्य निर्णय न घेतल्यास भविष्यात एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

दरम्यान, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर होत चालला असून, संबंधित विभागाने तातडीने या प्रकरणात हस्तक्षेप करून कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here