Home राजकीय नाना पटोलेंच्या आरोपांवर उलटले राजकारण; राईस मिल मालकाशी संबंध उघड झाल्याने ‘ब्लॅकमेलिंग’ची...

नाना पटोलेंच्या आरोपांवर उलटले राजकारण; राईस मिल मालकाशी संबंध उघड झाल्याने ‘ब्लॅकमेलिंग’ची चर्चा…

0
1863

गडचिरोली/मुंबई :
राज्यातील धान आणि तांदूळ खरेदी प्रक्रियेवरून सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करणारे नाना पटोले आता स्वतःच वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांच्या आरोपांनंतर सुरू झालेल्या राजकीय संघर्षाला आता नवे वळण मिळाले असून, ज्या व्यापाऱ्याचा उल्लेख करून त्यांनी आरोप केले, त्याच्याशी त्यांच्या घनिष्ठ संबंधांचे पुरावे समोर येऊ लागल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पटोले यांनी विधानसभेत ज्या देसाईगंज येथील व्यापाऱ्याचा उल्लेख केला होता, त्या आकाश अग्रवाल यांच्या राईस मिलचे उद्घाटन स्वतः पटोले यांनी २०२२ साली केले होते. याशिवाय विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दोघेही एकत्र उपस्थित असल्याचे फोटो सध्या समोर येत असून, ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
या पार्श्वभूमीवर, स्वतःच्या परिचयातील व्यक्तीचा संदर्भ देत सत्ताधाऱ्यांवर आरोप करणे म्हणजे सभागृहाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याची टीका राजकीय वर्तुळातून होत आहे. काही ठिकाणी तर हे संपूर्ण प्रकरण ‘ब्लॅकमेलिंग’चा प्रकार असल्याचीही चर्चा रंगू लागली आहे.
दरम्यान, या वादामागे केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोप नसून मोठे व्यावसायिक हितसंबंध दडले असल्याचेही बोलले जात आहे. गडचिरोली जिल्ह्यातील राईस मिल धारकांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असल्याचा आरोप स्थानिक स्तरावरून केला जात आहे. धान खरेदी प्रक्रियेला वळण देत भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील मिल मालकांना फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न होत असल्याचीही चर्चा आहे.
विशेष म्हणजे, गेल्या दीड वर्षात गडचिरोलीतील राईस मिल मालकांविरोधात शंभराहून अधिक तक्रारी दाखल झाल्याचे सांगितले जात आहे. या सततच्या तक्रारींमुळे अन्न व नागरी पुरवठा विभाग तसेच जिल्हा प्रशासन त्रस्त झाल्याचेही समोर येत आहे.
या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी, तसेच स्थानिक उद्योजकांचे संरक्षण करावे, अशी मागणी विविध स्तरातून होत आहे.
एकीकडे भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आणि दुसरीकडे समोर येणारे वैयक्तिक संबंध यामुळे हे प्रकरण आता अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणात कोणते नवे खुलासे होतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here