Home आरोग्य भाजप मध्ये “डॉक्टर आमदारांसह पाच डॉक्टर नेते असूनही गडचिरोलीत रुग्णसेवा कोलमडली; सामान्य...

भाजप मध्ये “डॉक्टर आमदारांसह पाच डॉक्टर नेते असूनही गडचिरोलीत रुग्णसेवा कोलमडली; सामान्य रुग्णालयातील हलगर्जीपणाने नागरिक संतप्त”

0
1022

 

गडचिरोली (प्रतिनिधी) : गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे गंभीर चित्र समोर येत असून, सत्ताधारी भाजपमध्ये डॉक्टरी पेशा असलेले स्थानिक आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी आमदार डॉ. देवराव होळी, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, भाजप नेते डॉ. चंदा कोडवते आणि डॉ. नितीन कोडवते असे एकूण पाच डॉक्टर नेते उपलब्ध असतानाही रुग्णसेवेत होत असलेली निष्काळजीपणा ही अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याची तीव्र प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयातील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे. कधी डॉक्टर अनुपस्थित असतात, तर कधी रुग्णवाहिकाच उपलब्ध नसते. अनेकदा अत्यावश्यक औषधांचा, विशेषतः कॅन्सरवरील औषधांचा तुटवडा जाणवतो. एवढेच नव्हे, तर रुग्णालय परिसरात स्वच्छतेचा पूर्ण अभाव असून चारही बाजूंनी नाल्या घाणीने भरलेल्या दिसून येतात. याकडे प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

वैद्यकीय महाविद्यालयाशी संबंधित डॉक्टरांबाबतही गंभीर तक्रारी पुढे येत आहेत. अनेक डॉक्टर विद्यार्थी शिकवण्याचे काम उरकून थेट घरी किंवा खासगी दवाखान्यांकडे वळतात. परिणामी सामान्य रुग्णालयातील रुग्णांना तासन्तास डॉक्टरांच्या प्रतीक्षेत बसावे लागते. काही ठिकाणी आर्थिक व्यवहारांच्या जोरावर जबाबदाऱ्या टाळल्या जात असल्याचीही चर्चा आहे, ज्यामुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अलीकडेच महिला व बाल रुग्णालयात ११ महिन्यांच्या बालिकेचा कथित वैद्यकीय हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली होती. या घटनेनंतरही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई किंवा सुधारणा केल्याचे दिसत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना अधिकच तीव्र झाली आहे.

दरम्यान, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीज व पाणीटंचाईची समस्या पुन्हा डोके वर काढण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम रुग्णालयातील सेवा-सुविधांवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मुख्यमंत्र्यांच्या पालकत्वाखालील जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोलीतच अशी दयनीय परिस्थिती निर्माण होणे, आणि त्यातही सत्ताधारी पक्षात पाच डॉक्टर नेते असूनही रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू राहणे, ही बाब शासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे.

नागरिकांच्या मते, संबंधित डॉक्टर नेत्यांनी आठवड्यातून काही तास जरी रुग्णालयाच्या अडचणी सोडवण्यासाठी दिले, तरी परिस्थितीत मोठा बदल घडू शकतो. मात्र सध्या मोजक्या डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफवरच संपूर्ण रुग्णालयाची जबाबदारी असल्याचे वास्तव आहे.

“डॉक्टर हा देवाचा दुसरा अवतार मानला जातो,” अशी समाजाची भावना आहे. मात्र गडचिरोलीतील विदारक परिस्थिती पाहता या ‘देवरूपी’ डॉक्टरांनी आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून रुग्णसेवेकडे प्राधान्याने लक्ष देणे अत्यंत गरजेचे असल्याची अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here