Home राजकीय “जिथे उत्खनन तिथे उत्पादन” : डोंगरगाव-येवली-शिवनी वाकडी परिसरातील शेतकरी JSW उद्योगाला जमीन...

“जिथे उत्खनन तिथे उत्पादन” : डोंगरगाव-येवली-शिवनी वाकडी परिसरातील शेतकरी JSW उद्योगाला जमीन लिजवर देण्यास तयार…

0
833

 

30 दिवसांत निर्णय न झाल्यास खनिज वाहतूक रोखण्याचा इशारा…

गडचिरोली, दि. ११ मार्च :

गडचिरोली जिल्ह्यात लोहखनिजावर आधारित मोठ्या उद्योगांच्या उभारणीची प्रक्रिया सुरू असताना डोंगरगाव, येवली, शिवनी वाकडी परिसरातील शेतकऱ्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी लोकसंवादाच्या माध्यमातून JSW सारख्या मोठ्या उद्योगाला जमीन देण्याची तयारी दर्शविली आहे, मात्र जमीन विक्रीऐवजी ती महिनेवारी भाडेतत्त्वावर (लिज) देण्याची अट त्यांनी घातली आहे.

शेतकऱ्यांच्या मते, उद्योग सुरू असेपर्यंतच जमीन उद्योगाकडे राहील. मात्र कोणत्याही कारणाने उद्योग बंद झाल्यास ती जमीन पुन्हा मूळ मालकांना परत देण्यात यावी, अशी स्पष्ट अट शेतकऱ्यांनी मांडली आहे.

स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, सुरजागड परिसरातून दररोज मोठ्या प्रमाणात लोहखनिजाचे उत्खनन सुरू आहे. या खनिजाची दररोज हजारो ट्रकद्वारे जिल्ह्याबाहेर तसेच इतर राज्यात वाहतूक होत आहे. अंदाजे सुमारे ३५०० ट्रक दररोज खनिज वाहतूक करीत असल्याचे सांगितले जात आहे. अशा प्रकारे खनिज बाहेर पाठविले जात राहिल्यास पुढील ५० वर्षांत हे नैसर्गिक संपत्तीचे स्रोत संपून जातील आणि गडचिरोली जिल्हा संसाधनांच्या बाबतीत ओसाड होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त करताना सांगितले की, गडचिरोली हा निसर्गसंपन्न जिल्हा असून येथे स्वच्छ नद्या, हिरवेगार अरण्य आणि समृद्ध नैसर्गिक वातावरण आहे. मात्र चुकीच्या धोरणांमुळे केवळ उत्खनन होत राहिले आणि स्थानिक पातळीवर उद्योग उभारले गेले नाहीत तर भविष्यात स्थानिकांना रोजगार मिळणार नाही आणि परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे.

याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी “जिथे उत्खनन तिथे उत्पादन” या तत्वावर ठाम भूमिका घेतली आहे. म्हणजे ज्या भागातून खनिज उत्खनन केले जाते, त्या जिल्ह्यातच त्यावर आधारित उद्योग उभारले जावेत, अशी त्यांची मागणी आहे.

शेतकऱ्यांनी सांगितले की, प्रत्येक एकर जमिनीबदल्यात मासिक भाडे करार आणि कुटुंबातील एका सदस्याला नोकरी या अटीवर ते आपली जमीन उद्योगाला देण्यास तयार आहेत.

दरम्यान, शेतकऱ्यांनी प्रशासन आणि उद्योग व्यवस्थापनाला ३० दिवसांचा अंतिम इशारा दिला आहे. या कालावधीत जिल्ह्यात उद्योग उभारणीसंदर्भात ठोस निर्णय न झाल्यास जिल्ह्याबाहेर किंवा इतर राज्यात जाणाऱ्या खनिज वाहतुकीला अडविण्याचा इशारा देण्यात आला आहे.

तसेच शेतकऱ्यांनी असा आरोपही केला आहे की, कोनसरी, सुरजागड आणि हेडरी परिसरातील प्रकल्पांमध्ये बाहेरील व्यक्तींना रोजगार दिला जात आहे, तर स्थानिक युवकांना संधी मिळत नाही. त्यामुळे बाहेरून आलेल्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करून स्थानिकांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

या सर्व मागण्यांमुळे गडचिरोली जिल्ह्यात खनिज उत्खनन, उद्योग उभारणी आणि स्थानिक रोजगाराच्या प्रश्नावर पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरू झाली असून प्रशासन आणि उद्योग व्यवस्थापन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here