गडचिरोली (जि. गडचिरोली) – गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरात प्रस्तावित JSW Group च्या प्रकल्पासाठी सुपीक व उत्पादनक्षम शेतीजमिनींच्या अधिग्रहणाची प्रक्रिया शासनाकडून सुरू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, अन्यायकारक जमीन अधिग्रहणाविरोधात भेंडाळा परिसरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत.
शासनाने ११ फेब्रुवारी रोजी निर्गमित केलेल्या जमीन अधिग्रहणासंदर्भातील शासन निर्णयाच्या (जीआर) निषेधार्थ भेंडाळा येथे शेतकऱ्यांनी सामुदायिकरित्या त्या आदेशाची जाहीर होळी करून संताप व्यक्त केला. मोठ्या संख्येने शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित राहून शासनाच्या भूमिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी शासनावर तीव्र टीका केली. “सुपीक व भरघोस उत्पादन देणाऱ्या जमिनी कवडीमोल दराने बळकावून शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा विकास नसून शेतकऱ्यांच्या संसाराचा व त्यांच्या पुढील पिढ्यांच्या भविष्याचा संपूर्ण नाश आहे,” असा आरोप त्यांनी केला.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांची संमती न घेता, स्थानिक ग्रामसभांना विश्वासात न घेता आणि पर्यावरणीय परिणामांचा सखोल विचार न करता जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया राबविणे हे लोकशाही तत्त्वांच्या विरोधात आहे. “हा निर्णय तात्काळ मागे घेतला नाही, तर जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा त्यांनी दिला.
येत्या १२ मार्च रोजी गडचिरोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत धरणे आंदोलन व मुंडन आंदोलन करण्यात येईल, अशी घोषणाही यावेळी करण्यात आली. या आंदोलनाद्वारे शासनाला शेतकऱ्यांच्या भावना व हक्कांची जाणीव करून दिली जाईल, असे आयोजकांनी स्पष्ट केले.
या निषेध आंदोलनात माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, चामोर्शी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रमोद भगत, पर्यावरण सेल अध्यक्ष राजेश ठाकूर, नेताजी गावतुरे, अनिल कोठारे, माजी जिल्हा परिषद सदस्या कविताताई भगत, दिवाकर निसार, ढिवरू मेश्राम, दिगंबर धानोरकर, विजय लाड, नारायण बांगरे, सदानंद जवादे, पांडुरंग भरे, संजय खेडेकर, भुवनेश्वर चौधरी, धनराज पोरटे, मनोहर तुंबडे, उमाजी ठाकूर, काशिनाथ चौधरी, रोहिदास धोबे, गुरुदास चौधरी, कैलास सातपुते, विकास रायसीडाम, नीलकंठ कुथे, मारुती उमलवार, नरेंद्र जुवारे, सौ. कुंदाताई जुवारे, सुनील कन्नाके, नवनाथ चौधरी, संजय चलाख, दामोदर आभारे, मधुकर ढोबे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारो शेतकरी बांधव-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भेंडाळा परिसरातील जमीन अधिग्रहणाचा प्रश्न आता अधिकच तापला असून, शासनाने या आंदोलनाची दखल घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे.




