Home ब्रेकिंग न्यूज गडचिरोली येथे महसूल विभागाला अंधारात ठेवून आमदारांकडून ‘महसूल विश्रामगृहाचे भूमिपूजन’; प्रशासन अनभिज्ञ,...

गडचिरोली येथे महसूल विभागाला अंधारात ठेवून आमदारांकडून ‘महसूल विश्रामगृहाचे भूमिपूजन’; प्रशासन अनभिज्ञ, राजकीय वर्तुळात खळबळ…

0
809

 

महसूल विभागाची परवानगी नसताना भूमिपूजन केल्याचा आरोप; प्रसिद्धीसाठी पुन्हा ‘राजहट्ट’ केल्याची शहरात चर्चा…

गडचिरोली : शहरातील महिला रुग्णालय परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या १०० खाटांच्या रुग्णालयासमोरील महसूल विभागाच्या जागेवर महसूल विश्रामगृह उभारण्यात येणार असल्याची बतावणी करून स्थानिक आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी कोणतीही अधिकृत परवानगी किंवा प्रशासनाचा नियोजित कार्यक्रम नसताना स्वतःच भूमिपूजन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे महसूल विभाग आणि जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळात तीव्र चर्चा सुरू झाली आहे.

प्रशासनाच्या माहितीसह कोणताही कार्यक्रम नव्हता…

माहितीनुसार, संबंधित जागेवर महसूल विश्रामगृह उभारण्यात येणार असल्याचे सांगत आमदार डॉ. नरोटे यांनी काल दुपारी आपल्या चार-पाच कार्यकर्त्यांसह त्या ठिकाणी जाऊन स्वतःच्या हस्ते भूमिपूजन केले. विशेष म्हणजे, या कार्यक्रमासाठी महसूल विभागाची कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आली नव्हती, तसेच जिल्हा प्रशासनानेही असा कोणताही कार्यक्रम निश्चित केला नव्हता.

भूमिपूजनानंतर आमदारांनी या कार्यक्रमाचे फोटो तात्काळ आपल्या सोशल मीडियावर शेअर केले. यामुळे प्रशासनालाही या प्रकाराची माहिती सोशल मीडियावरूनच मिळाल्याचे समोर आले आहे.

महसूल विभाग आणि प्रशासनाने व्यक्त केली अनभिज्ञता…

या संदर्भात गडचिरोलीचे उपविभागीय अधिकारी एम. रमेश यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी स्पष्टपणे सांगितले की,

“महसूल विभागाकडून अशा प्रकारचा कोणताही भूमिपूजन कार्यक्रम ठरविण्यात आलेला नव्हता. जर असा कार्यक्रम झाला असेल, तर तो त्यांच्या व्यक्तिगत स्तरावर केलेला आहे. त्या ठिकाणी सरकारी बांधकाम होणार आहेत.

तसेच गडचिरोलीचे तहसीलदार सागर कांबळे यांनीही सांगितले की, “महसूल विभागाच्या वतीने कोणतेही भूमिपूजन आयोजित करण्यात आले नव्हते. याबाबत सविस्तर माहिती घेऊन पुढील कार्यवाहीबाबत निर्णय घेतला जाईल.”

प्रसिद्धीसाठी प्रशासनाला डावलल्याचा आरोप….

दरम्यान, महसूल विभाग आणि स्थानिक प्रशासनाला विश्वासात न घेता आमदारांनी स्वतःच भूमिपूजन केल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. जर महसूल विभागाने अधिकृत कार्यक्रम आयोजित केला असता, तर त्यामध्ये आमदारांसह नगराध्यक्ष, महसूल अधिकारी आणि जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहिले असते.

या वेळी आमदार साहेबांच्या सोबत त्यांचे सुरक्षा रक्षक, भाजप चे जिल्हा महामंत्री गोविंद सारडा याचे बंधू नंदकिशोर सारडा तथा पुतणे प्रफुल सारडा आणि जवळचे नातेवाईक रितेश राठी यांच्या सह काही कार्मायकर्ते उपस्थित होते,मात्र , अशा प्रकारे केवळ काही कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन केल्यामुळे हा प्रकार केवळ राजकीय प्रसिद्धी मिळविण्यासाठी करण्यात आल्याची टीका होत आहे.

प्रशासनावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न?

या घटनेमुळे आमदारांनी महसूल विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला का, किंवा स्वतःची राजकीय प्रतिमा उंचावण्यासाठी प्रशासनाला अंधारात ठेवून हा कार्यक्रम केला का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

महसूल विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकारामुळे महसूल विभागातील अधिकारीही आश्चर्यचकित झाले असून संपूर्ण विभाग या घटनेमुळे संभ्रमात पडला आहे.

सत्ताधारी पक्षाच्या प्रतिमेवरही प्रश्नचिन्ह…

या घटनेनंतर शहरात विविध स्तरावर चर्चा सुरू झाली असून आमदारांच्या या कृतीमुळे सत्ताधारी भारतीय जनता पक्ष च्या प्रतिमेलाही धक्का बसत असल्याची टीका होत आहे.

मुख्यमंत्र्यांच्या पालकत्व असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातच त्यांच्या पक्षाच्या आमदाराकडून प्रशासनाला विश्वासात न घेता शिवजयंती या सुट्टीच्या दिवशी सरकारी जागेवर भूमिपूजन केल्यामुळे ही घटना आता संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

दरम्यान, महसूल विभागाने या प्रकरणाची सविस्तर माहिती घेण्याची प्रक्रिया सुरू केली असून, अधिकृत परवानगीशिवाय सरकारी जागेवर भूमिपूजन केल्याबाबत कोणती भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या घटनेमुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वयावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, हा प्रकार केवळ प्रसिद्धीसाठीचा ‘राजहट्ट’ होता का, याबाबत चर्चा अधिक तीव्र झाली आहे.

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना मोबाईल आणि वॉट्स अप वर प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणतेही उत्तर दिलेले नाही.

आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे यांना संपर्क करण्यासाठी प्रयत्न केला असता त्यांनी मोबाईल उचलला नाही…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here