Home ब्रेकिंग न्यूज रस्त्यावर ऑइल सांडल्याने दुचाकी अपघात; एकाचा पाय फ्रॅक्चर, पोलिसांच्या तत्परतेने मोठी दुर्घटना...

रस्त्यावर ऑइल सांडल्याने दुचाकी अपघात; एकाचा पाय फ्रॅक्चर, पोलिसांच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली…

0
224

 

गडचिरोली, दि. 21 : शहरातील चंद्रपूर मार्गावरील कारगिल चौक परिसरात शनिवारी (दि. 21 फेब्रुवारी 2026) दुपारी सुमारे 2.30 वाजताच्या सुमारास दुचाकी वाहनाच्या इंजिनमधील ऑइलचा नट निघाल्याने सुमारे 100 मीटरपर्यंत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ऑइल सांडल्याची धक्कादायक घटना घडली. या अचानक निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीमुळे मागून येणारी वाहने घसरू लागली आणि दोन दुचाकीस्वारांचा अपघात झाला.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्यावर सांडलेल्या ऑइलमुळे संपूर्ण मार्ग अत्यंत घसरडा बनला होता. या घसरणाऱ्या रस्त्यावरून जात असताना दोन दुचाकीस्वारांचा तोल गेला आणि ते रस्त्यावर पडले. या अपघातात एका व्यक्तीच्या गुडघ्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा पाय फ्रॅक्चर झाला. जखमी व्यक्तीला तातडीने उपचारासाठी शहरातील डॉ. बिडकर दवाखान्यात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणीनंतर शस्त्रक्रियेचा सल्ला दिल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, जखमी व्यक्ती हे गडचिरोली पोलीस स्टेशन येथे कार्यरत पीएसआय तरारे यांचे नातेवाईक असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम सुरू केले.

पुढील अपघात टाळण्यासाठी पोलिसांनी तातडीने महत्त्वाची कार्यवाही करत सांडलेल्या ऑइलवर ताबडतोब सुकलेली माती टाकली. त्यामुळे रस्त्यावरील पूर्ण चिकटपणा आणि घसरटपणा दूर करण्यात आला. तसेच संपूर्ण मार्गाची स्वच्छता करून रस्ता पुन्हा सुरक्षित करण्यात आला. ही कार्यवाही एपीआय शरद मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार विजय वेलादी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जबाबदारीने पार पाडली.

या घटनेमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, पोलिस आणि वाहतूक विभागाच्या तत्परतेमुळे रस्ता लवकरच वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात आला. पोलिसांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली असून, स्थानिक नागरिकांकडून पोलिस कर्मचाऱ्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर वाहनचालकांनी आपल्या वाहनांची नियमित तपासणी करून तांत्रिक बिघाड टाळण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या अपघातांना आळा बसू शकेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here