
इंदिरा गांधी चौकाजवळ दुपारी घटना; नगरपालिका व वीज विभागाच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह…
गडचिरोली: इंदिरा गांधी चौकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पोस्ट ऑफिसच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आज दुपारी सुमारे १२ वाजताच्या सुमारास इलेक्ट्रिक डीपीखाली चपला-जोडे विकणाऱ्या फूटपाथ दुकानात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. डीपीमधून उडालेल्या अंगारामुळे दुकानातील साहित्याला आग लागली.
या घटनेत संबंधित दुकानदारास कोणतीही इजा झाली नसल्याने मोठी जीवितहानी सुदैवाने टळली, अशी प्रतिक्रिया घटनास्थळी उपस्थित प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली. शेजारील दुकानातून तातडीने लहान अग्निशामक सिलेंडर आणून आग विझवण्यात आल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली.
घटनेची माहिती तात्काळ वीज विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तसेच स्थानिक नगरपालिकेला देण्यात आली. माहिती मिळताच वीज विभाग व नगरपालिका यांची यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. खबरदारीचा उपाय म्हणून त्या परिसरातील वीजपुरवठा बंद करण्यात आला तसेच डीपीलगत करण्यात आलेले अतिक्रमण तातडीने हटवण्यात आले.
महत्त्वाचे म्हणजे, याच रस्त्यावर जिल्हा परिषद हायस्कूलच्या कोपऱ्यावर दोन वर्षांपूर्वी डीपीखाली असलेल्या भाजीपाला दुकानाजवळ दुरुस्तीसाठी गेलेल्या वीज विभागाच्या लाईनमनचा शॉक लागून मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली होती. असे असतानाही आजही हजारो व्होल्ट क्षमतेच्या डीपीजवळ फूटपाथवर दुकाने उभारली जात असल्याने नगरपालिका व वीज विभागाच्या निष्काळजीपणावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
आजच्या घटनेत मोठी दुर्घटना घडू शकली असती; मात्र सुदैवाने थोड्याफार प्रमाणातच दुकानातील साहित्य जळाले. पाहणीदरम्यान नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना संबंधित दुकानदार हा मागील ८ ते १० वर्षांपासून त्या ठिकाणी वारंवार दुकान लावत असल्याची माहिती मिळाली. तसेच दोन-तीन वर्षांपूर्वीही याच ठिकाणी अशाच प्रकारे आग लागल्याची घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
हजारो व्होल्ट वीजप्रवाह असलेल्या डीपी बॉक्सलगत अतिक्रमण करून दुकाने लावली जात असतील, तर अशा प्रकारच्या धोकादायक प्रकारांना तातडीने आळा घालावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून जिल्हा प्रशासनाकडे करण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या पालकत्वाखालील जिल्ह्यात अशा प्रकारचा दुर्लक्षितपणा कायम राहिल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासन, वीज विभाग आणि नगरपालिका यांनी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.



