गडचिरोली :
शहरातील आरमोरी मार्गावरील कठाणी नदी परिसरात असलेली स्मशानभूमी दीर्घकाळापासून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अस्वच्छता व अपुऱ्या मूलभूत सुविधांमुळे नागरिकांच्या रोषाचे कारण बनली होती. नागरिकांच्या दुःखाच्या क्षणी होणाऱ्या गैरसोयींची गंभीर दखल घेत नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर व नगरसेवक सागर निंबोरकर यांनी स्मशानभूमीची संयुक्तपणे प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा सखोल आढावा घेतला.
पाहणीदरम्यान अग्निसंस्काराच्या ठिकाणी लोखंडी कठडा तुटलेला असणे, पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था नसणे,बोअरवेल दुरुस्ती, शौचालयांची कमतरता, अंत्यविधीसाठी आवश्यक सोयींचा अभाव तसेच परिसरात पसरलेली घाण व कचरा स्पष्टपणे निदर्शनास आला. नागरिकांच्या अत्यंत संवेदनशील व दुःखाच्या क्षणी मूलभूत सुविधांचा अभाव ही गंभीर बाब असून, अशा प्रकारचे दुर्लक्ष यापुढे खपवून घेतले जाणार नाही, असा ठाम इशारा नगराध्यक्ष व नगरसेवकांनी दिला.
स्मशानघाटाकडे जाणाऱ्या मार्गावर साचलेली माती, ठिकठिकाणी पसरलेला कचरा व अस्वच्छतेमुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे आढळून आले. याची तातडीने दखल घेत संबंधित कर्मचाऱ्यांना त्वरित साफसफाई करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच स्मशानभूमी परिसर स्वच्छ, सुरक्षित व सन्मानजनक ठेवण्यासाठी नियमित देखरेख ठेवण्याचे व जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले.
स्मशानभूमी हा अत्यंत संवेदनशील व नागरिकांच्या भावनांशी निगडित असलेला परिसर असल्याने येथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सन्मान, स्वच्छ वातावरण व आवश्यक सुविधा मिळणे ही नगरपालिकेची जबाबदारी असल्याचे नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांनी स्पष्ट केले. स्मशानभूमीतील सर्व अपूर्ण कामे प्राधान्याने, वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण केली जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.
नगरसेवक सागर निंबोरकर यांनीही प्रशासनाच्या हलगर्जीपणाला आळा घालण्यात येईल आणि नागरिकांना कोणतीही गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, अशी ठाम भूमिका मांडली.
या पाहणीप्रसंगी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिंदुरकर, कनिष्ठ अभियंता खामनकर तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.




