Home भ्रष्टाचार भाजप नगरसेवकाच्या नातेवाईकाच्या रस्ते कामाचे काँग्रेस नगरसेवकांकडून भूमिपूजन; 42 टक्के कमी दर...

भाजप नगरसेवकाच्या नातेवाईकाच्या रस्ते कामाचे काँग्रेस नगरसेवकांकडून भूमिपूजन; 42 टक्के कमी दर असूनही गुणवत्ता कायम ठेवण्यावर ठाम लक्ष…

0
466

 

गडचिरोली | प्रतिनिधी

गडचिरोली शहरात 42 टक्के कमी दराने मंजूर करण्यात आलेल्या रस्ते बांधकामात निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याची माहिती समोर येताच नगरपालिकेतील विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या पाचही नगरसेवकांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित काम तात्काळ थांबविले होते. विशेष म्हणजे या रस्ते कामाचा संबंधित ठेकेदार हा सत्ताधारी भाजपच्या एका नगरसेवकाचा नातेवाईक असल्याची बाब उघडकीस आल्याने, संपूर्ण प्रकरणाला राजकीय वळण मिळाले असून शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.

संबंधित रस्ते कामात अंदाजपत्रकात नमूद केलेल्या अटी-शर्तींचे उल्लंघन करून निकृष्ट साहित्याचा वापर होत असल्याचे निदर्शनास येताच काँग्रेस नगरसेवकांनी तीव्र संताप व्यक्त केला. यानंतर नगराध्यक्षांना घटनास्थळी पाचारण करून संपूर्ण प्रकाराची माहिती देण्यात आली. यावेळी नगराध्यक्षांनी संबंधित ठेकेदाराला चांगलेच खडसावत,

“काम 42 टक्के कमी दराने घेतले असले तरी अंदाजपत्रकातील सर्व अटी-शर्ती काटेकोरपणे पाळाव्याच लागतील. खर्च कमी करण्याच्या नावाखाली दर्जाशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही,” असे स्पष्ट निर्देश नगराध्यक्षांनी दिले.

तसेच या कामावर बांधकाम विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी सातत्याने लक्ष ठेवावे, नियमबाह्य काम आढळल्यास तात्काळ कारवाई करावी, असे आदेशही नगराध्यक्षांनी दिले. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी निकृष्ट काम उघडकीस आणल्यामुळे सत्ताधाऱ्यांची चांगलीच धांदल उडाल्याचे चित्र त्यावेळी दिसून आले.

दरम्यान, मागील दिवशी थांबविण्यात आलेल्या या रस्ते कामाला पुन्हा गुणवत्तापूर्ण पद्धतीने काल सुरुवात करण्यात आली. विशेष बाब म्हणजे भाजपच्या नगरसेवकाच्या नातेवाईकाच्या या रस्ते कामाचे भूमिपूजन थेट काँग्रेसच्या नगरसेवकांकडून करण्यात आले. निकृष्ट काम उघडकीस आणणाऱ्या काँग्रेसच्या नगरसेविका मेघा मोहन वरगंटीवार यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून आपल्या हस्ते भूमिपूजन करून कामाची नव्याने सुरुवात करून घेतली.

यावेळी बोलताना नगरसेविका मेघा वरगंटीवार म्हणाल्या, की  “संबंधित ठेकेदार हा सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकाचा नातेवाईक असला तरी कायदा सर्वांसाठी समान आहे. ठेकेदाराने काम जरी 42 टक्के कमी दराने घेतले असले तरी कामाच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. निकृष्ट काम करण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाईची मागणी करण्यात येईल.”

भूमिपूजनाच्या वेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रस्ते कामाकडे आपण स्वतः जातीने लक्ष ठेवणार असून, गडचिरोली शहरातील ज्या-ज्या ठिकाणी निकृष्ट दर्जाची विकासकामे सुरू असल्याचे आढळतील, ती कामे तात्काळ थांबवून चौकशी लावावी व दोषी ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणीही नगरसेविका मेघा वरगंटीवार यांनी यावेळी केली.

सत्ताधारी भाजपशी संबंधित ठेकेदारांच्या कामांवर विरोधी पक्षाकडून सुरू असलेल्या या थेट कारवाईमुळे नगरपालिकेतील विकासकामांच्या पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रशासन आणि सत्ताधारी यापुढे काय भूमिका घेतात, याकडे आता गडचिरोलीकरांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here