कुरखेड़ा :
कुरखेड़ा नगर पंचायत कार्यालयात देशाच्या राष्ट्रध्वज तिरंग्याचा अत्यंत लज्जास्पद आणि धक्कादायक अपमान झाल्याची घटना उघडकीस आली असून, यामुळे संपूर्ण शहरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या गंभीर प्रकाराची माहिती समोर येताच प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रध्वजाला योग्य तो सन्मान देऊन सुरक्षित ठिकाणी ठेवण्याऐवजी तो कचरा गाडीमध्ये मलबा व कचऱ्याच्या ढिगाऱ्यात लापरवाहीने पडून असल्याचे आढळून आले. राष्ट्रध्वजाचा असा उघड अपमान पाहून स्थानिक नागरिकांच्या भावना दुखावल्या असून नगर पंचायत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रध्वज हा देशाची अस्मिता, स्वाभिमान आणि एकतेचे प्रतीक आहे. त्याचा अपमान होणे म्हणजे संपूर्ण देशाचा अपमान असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. या प्रकरणाला जबाबदार असलेल्या नगर पंचायतमधील संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी शहरवासीयांकडून होत आहे.
दरम्यान, या लज्जास्पद प्रकाराची दखल जिल्हा प्रशासनाने त्वरित घ्यावी आणि जिल्हाधिकारी यांनी स्वतः हस्तक्षेप करून दोषींवर कडक कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी स्पष्ट निर्देश द्यावेत, अशीही मागणी नागरिकांनी केली आहे.




